पट पालिकेचा
दोघांच्या भांडणाचा तिसरा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या वाघ विरुद्ध सिंह यांच्यात सुरू झालेल्या भांडणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न पंजाने सुरू केला आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झाकली गेलेली पंजाची मूठ उघडणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
मुंबई महानगरपालिकेत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून नळावरच्या भांडणासारखा युतीच्या मित्र पक्षांमध्ये वाद होतो. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच हे उद्दिष्ट ठेवून दोन्ही पक्ष उतरले आहेत.
मित्र नव्हे तर शत्रू पक्षांसारखे दोघे संघर्ष करीत आहेत. गेल्या आठवडय़ात वाघ आणि सिंहावरून उभयतांमध्ये ठिणगी पडली. वाघाला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना शिवसेनेच्या वाघाने आपल्या पद्धतीने उत्तर दिले. वाघ आणि सिंहाच्या या वादात विरोधी पक्ष आहेत कुठे, असा प्रश्न पडतो.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने मोर्चे, आंदोलने या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. पण मतदारांचा या दोन्ही पक्षांना किती पाठिंबा आहे? देशभर काँग्रेसची पीछेहाट होत आहे. नेतेमंडळींच्या उद्योगांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात विरोधकांची भूमिका सत्तेतील भागीदार शिवसेना पार पाडीत आहे. याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत सत्तेतील शिवसेनेच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. सध्या तरी शिवसेना आणि भाजपमध्येच सामना असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसला जनमानसाचा पाठिंबा मिळावा म्हणून संजय निरुपम यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि शिवसेनेतील भांडणाचा फायदा उठविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. झोपडपट्टी, फेरीवाले, समाजातील विविध घटक यांच्यापर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी निरुपम यांची धडपड सुरू आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादीला चांगले यश मिळावे म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. दोघांच्या भांडणाचा तिसऱ्याला फायदा होतो का, हा खरा प्रश्न आहे.