काँग्रेसबरोबर आघाडी कायम असल्याचे जाहीर केले असतानाच डाव्या पक्षांच्या मेळाव्याला राष्ट्रवादीची उपस्थिती, यापाठोपाठ मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याकरिता प्रयत्न करण्याचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आश्वासन हे सारे पवार यांच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग असला तरी यातून काँग्रेसला खिजविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी शिवसेना नेत्यांना पवार यांच्याकडे धाव घ्यावी लागली. रविवारी बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनाला पवार यांच्यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित राहिले. अर्थात, पवार यांची बाळासाहेबांबरोबर खास मैत्री होती. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी पवार आता प्रयत्न करणार आहेत. तसे आश्वासन त्यांनी शिवसेना नेत्यांना दिले. शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर पवार लगेचच स्मारकाची नियोजित जागा बघण्याकरिता महापौर बंगल्याजवळ गेले. ठाणे जिल्हा, मराठवाडय़ातील काही भाग, पुणे जिल्ह्य़ात शिरूर लोकसभा मतदारसंघ आदी ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी मुख्यत: लढत होते. राजकीय पातळीवर या दोन पक्षांमध्ये लढत होत असली तरी मैत्रीला जागून पवार यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाकरिता पुढाकार घेतला आहे. काँग्रेसला दोनच आठवडय़ांपूर्वी डाव्या पक्षांच्या नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्याला राष्ट्रवादीने उपस्थिती लावली होती. निधर्मवादी शक्तींच्या मेळाव्याला पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याचे प्रतिपादन तेव्हा पवार यांनी केले होते. राष्ट्रवादीच्या उपस्थितीबद्दल त्याची चर्चाही झाली होती. आता शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाकरिता पुढाकार घेऊन पवार यांनी पुन्हा एकदा वेगळा संदेश दिला आहे.  
गेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसबरोबर आघाडीचा घोळ सुरू असताना पवार हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मुंबईत खेळण्यासाठी विरोध करू नये म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला गेले होते. तेव्हाही पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात व विशेषत: काँग्रेसमध्ये चर्चा झाली होती.
आताही काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले असले तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे जागावाटप करण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. विशेषत: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बेरजेच्या राजकारणावर पवार यांचा नेहमीच भर राहिला असला तरी डाव्यांच्या मेळाव्याला उपस्थिती, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हे सारेच काँग्रेसला खिजविण्यासाठीच असल्याचे बोलले जाते. याबरोबरच स्मारकासाठी पुढाकार घेतला म्हणून शिवसैनिकांची सहानुभूती पवार यांना मिळू शकते. तसेच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात शिवसेना अयशस्वी ठरली व पवार यांची मदत घ्यावी लागली, हा संदेश जाणे शिवसेनेसाठीही अडचणीचे ठरणार आहे.
बारा मतदारसंघांत राष्ट्रवादी -शिवसेना समोरासमोर
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी पवार यांनी पुढाकार घेतला असला तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना १२ मतदारसंघांत समोरासमोर लढले होते. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला २२ जागा आल्या होत्या, त्यापैकी निम्म्या मतदारसंघांत उभयता एकमेकांच्या समोर होते. याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ७०च्या आसपास मतदारसंघांत लढत झाली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता शिवसेनेकडे पवारांकडे जाणे व पवारांनी पुढाकार घेणे याला महत्त्व प्राप्त होते.