मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित आघाडीला ६२ जागा सोडूनही त्यांनी उमेदवार न दिल्याने १६ जागांवर आघाडीचा एकही उमेदवार नाही, तर काँग्रेसच्या एका उमेदवाराने अर्जच न भरल्याने १७ जागांवर काँग्रेस-वंचित आघाडीचे उमेदवारच नाहीत. त्याचा लाभ भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) किंवा शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित आघाडी झाली. वंचितला काँग्रेसकडून ६२ जागा सोडण्यात आल्या. मात्र या ६२ पैकी २१ जागांवर वंचितला उमेदवारच न मिळाल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी या जागा काँग्रेसला परत करण्यात आल्या. यापैकी पाच जागा पुन्हा वंचितकडून मागण्यात आल्या.
मात्र १६ जागांवर ऐनवेळी उमेदवारच न मिळाल्याने तर प्रभाग क्र. १८ मधून काँग्रेस उमेदवार नीलम म्हात्रे यांनी अर्जच न भरल्याने एकूण १७ जागांवर काँग्रेस व वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. तिन्ही पक्षांनी अनेक चर्चांनंतर जागावाटपावर सहमती दर्शवली. यात काँग्रेसला १५५, वंचित बहुजन आघाडीला ६२ आणि राष्ट्रीय समाज पार्टीला (रासप) १० जागा मिळाल्या होत्या. मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि वंचितचा एकूण १७ जागांवर उमेदवारच उभा न राहिल्याने आता सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे) त्याचप्रमाणे विरोधातील शिवसेना (ठाकरे) व मनसेला लाभ होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने ६२ जागा मागून ४६ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर १६ जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार नाहीत. याचा राजकारणात चुकीचा संदेश गेल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. शिवाय उमेदवार नाहीत तर इतक्या जागा का मागितल्या, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला केला.
वंचित बहुजन आघाडीने प्रभाग ६, ११ ते १५, २१, ३०, ४६, ७३, ८०, ८४, ८५, १०८, ११७, १५३, १७७, १८२, १९५, १९८, २०७ या जागा शेवटच्या क्षणी काँग्रेसला परत केल्या. तिकीटवाटप करताना काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार असूनही त्यांना नाराज करावे लागले. आणि आयत्यावेळी जागा परत केल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणेही काँग्रेसला शक्य झाले नाही. याबाबत बोलताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आम्हाला चुकीचे मतदारसंघ दिल्याने ऐनवेळी उमेदवार उभे करता आले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.
