मुंबई : काँग्रेसने मुंबईच्या अध्यक्षा प्रा. वर्षां गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवून, मुंबईत किमान एका तरी जागेवर भाजपच्या विरोधात दमदार लढतीचे संकेत दिले आहेत. उमेदवारी जाहीर होताच, वर्षां गायकवाड यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणे आणि ठाकरे यांनी माझे मत गायकवाड यांनाच, असे जाहीर करणे म्हणजे, मुंबईतील किमान दोन मतदारसंघापुरता हा काँग्रेस व शिवसेनेचा शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा राजकीय प्रयोग असल्याचे मानले जात आहे. 

 दक्षिण-मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र अहा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने घेतला. वर्षां गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली. २०१४ नंतर या मतदारसंघातील गणिते बदलली, हा मतदारसंघ सलग दोन वेळा भाजपच्या ताब्यात गेला. याच मतदारसंघात वास्तव्य असलेले उद्धव ठाकरे यांनी मी वर्षां गायकवाड यांना मत देणार, असे जाहीर केले आहे.

हेही वाचा >>>उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करू; गोयल यांचा निर्धार ; राहुल गांधींनी लढण्याचे आव्हान

त्यातून त्यांना दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई यांच्या पाठीशी गायकवाड यांची धारावीची ताकद उभी करायची आहे. त्याच वेळी ठाकरेंचे वर्षां गायकवाड यांना मत म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील ठाकरेंना मानणाऱ्या तमाम मतदारांना काँग्रेसच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतील समीकरणे..

माहीम विधानसभा मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. वडाळा मतदारसंघात वडाळा व नायगाव या भागात बौद्ध मतदारांची संख्या मोठी आहे. धारावी हा बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुसमाज घटकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात माटुंगा व धारावीतही दलित मतदार मोठय़ा संख्येने आहेत. शीव कोळीवाडय़ात त्या तुलनेत दलित मतदारांची संख्या कमी आहे. पुढे चेंबूर मतदारसंघात दलित मतदारांचे विशेषत: बौद्ध समाजाचे वर्चस्व आहे. नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. अणुशक्तीनगरमध्येही मुस्लीम मतदारांच्या खालोखाल दलित मतदार आहेत.