येथील विद्या प्रसारक मंडळाच्या दुर्मीळ ग्रंथ डिजिटलायझेशन योजनेत आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी ग्रंथ ई-बुक स्वरूपात उपलब्ध झाले असून राज्यभरातील विविध ग्रंथालयांमध्ये असणाऱ्या आठ लाख ग्रंथांच्या सूचीचेही संगणकीकरण झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदललेल्या वाचन संस्कृतीला पूरक ठरणाऱ्या या योजनेत तीनशेहून अधिक दुर्मिळ पुस्तके ई-बुकच्या माध्यमातून वाचकांना घरच्या घरी ऑनलाइन वाचता येणार आहेत.
मराठीत उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा वाचकांना संगणकांच्या एका क्लिकसरशी उपलब्ध व्हावी, या हेतूने ठाणे विद्या प्रसारक मंडळ संस्थेने ग्रंथांच्या डिजिटलाझेशनचा उपक्रम हाती घेतला असून त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांची ग्रंथ सूची ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न  केला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर अशा २० जिल्ह्य़ांतील सार्वजनिक व महत्त्वाच्या ग्रंथालयातील ग्रंथ सूची या माध्यमातून संस्थेने इंटरनेटवर आणली आहे. http://www.granthalaya.org या संकेतस्थळावर ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शनिवारी विद्या प्रसारक मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. विजय बेडेकर यांनी ही माहिती दिली.  
उपलब्ध ग्रंथसंपदा..
अभ्यासकांना १८४४ ते १८९९ या ५६ वर्षांच्या कालावधीतील ६७ आद्यमुद्रित मराठी ग्रंथसंग्रह तसेच श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या मराठीतील पहिल्या ज्ञानकोशाचे संपूर्ण १२ खंड अशी दुर्मीळ ग्रंथ संपदा ई-बुकच्या माध्यमातून वाचकांना वाचता येणार आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सहा सोनेरी पाने, लंडनची बातमीपत्रे, अंधश्रध्दा निर्मूलन कथा, ‘क्ष’किरणे, साने गुरुजी यांच्या अनमोल गोष्टी, गोप्या, दुदैवी, श्याम, सती तर भारतीय उपकथा, भारतीय युध्द, भारतीय साम्राज्य अशा विविध वर्गवारीतील लोकप्रिय पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत.