मुंबई : मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १३५च्या शिवसेनेच्या नगरसेविका समीक्षा साक्रे यांच्या निवडणुकीला आव्हान देणारा अपक्ष उमेदवार कै लाशी वर्मा यांचा अर्ज लघुवाद न्यायालयाने शनिवारी फेटाळला.

साक्रे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत वर्मा यांनी साक्रे यांच्या निवडणुकीला  आव्हान दिले होते. निवडणूक अधिकाऱ्याने आपला उमेदवारी अर्ज अयोग्य पद्धतीने दाखल करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

२०१७ सालच्या पालिकेच्या निवडणुकांमध्ये साक्रे या प्रभागातून बहुमताने निवडून आल्या होत्या. त्या खालोखाल वर्मा यांना मते मिळाली होती. मात्र साक्रे यांनी त्या पालिकेच्या कंत्राटदार असल्याची माहिती लपवून मतदारांचीही फसवणूक केल्याचा आरोप वर्मा यांनी केला होता.

तर दोन राजकीय पक्षांतील वादाच्या पार्श्वभूमीवर वर्मा यांनी हा अर्ज केल्याचा दावा साक्रे यांच्या वतीने अ‍ॅड्. मोहन टेकावडे यांनी युक्तिवाद करताना केला. पालिके नेही निवडणूक प्रक्रिया योग्य आणि नियमानुसार घेण्यात आल्याचा आणि साक्रे यांचा उमेदवारी अर्जही योग्य पद्धतीनेच दाखल करून घेतल्याचा दावा करत वर्मा यांच्या अर्जाला विरोध केला.