३५ हजार रुपयांच्या भरपाईचेही ग्राहक न्यायालयाचे महाविद्यालयाला आदेश

मुंबई : मेकॅनिकल अभियंता बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या, मात्र गुण कमी मिळाल्याने नाखुशीने जैववैद्यकीय अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या आणि त्यासाठीचे शुल्क भरणाऱ्या बोरिवली येथील विद्यार्थ्यांला ग्राहक न्यायालयाने दिलासा दिला. तसेच शुल्क परत करण्यास नकार देऊन निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या द्वारकादास जे संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयाला न्यायालयाने दोषी ठरवले. अभ्यासक्रमासाठी भरलेल्या १.२३ लाख रुपये शुल्काच्या परताव्यासह भरपाई म्हणून ३५ हजार रुपये या विद्यार्थ्यांला देण्याचे आदेशही न्यायालयाने महाविद्यालयाला दिले.

सात वर्षांपूर्वी २०१४ मध्ये तक्रारदार मुलाला मेकॅनिकल अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा होता. मात्र त्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक गुण मिळाले नाहीत. त्यामुळे त्याच्या वडिलांनी इच्छा नसतानाही जैववैद्यकीय अभियांत्रिकीला त्याच्यासाठी प्रवेश घेतला. प्रवेशाच्या वेळी महाविद्यालयाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या वडिलांना आश्वासन दिले की नंतर ते मुलाला मेकॅनिकल अभियांत्रिकीला वर्ग करू शकतात किंवा आता मिळालेला प्रवेश रद्द करून दुसऱ्या महाविद्यालयात जाऊ शकतात. तसेच प्रवेश रद्द केल्यास त्यांना एक हजार रुपये कपात करून शुल्काची रक्कम परत केली जाईल, असेही सांगण्यात आले.

त्यानुसार तक्रारदाराच्या मुलाला ५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी तक्रारदाराने हा प्रवेश रद्द करत असल्याचे महाविद्यालयाला कळवले. त्यानंतर म्हणजे १४ ऑगस्टला महाविद्यालयाने गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु मुलाचा प्रवेश रद्द केल्यावर महाविद्यालयाने तक्रारदाराला जैववैद्यकीय अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी भरलेले शुल्क परत करण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांचे वडील संजय शेडगे यांनी जुलै २०१५ मध्ये महाविद्यालयाविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. ग्राहक न्यायालयाने महाविद्यालयाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या या वागण्यावर आदेशात ताशेरे ओढले. तक्रारदारासारख्या पालकांच्या मुलांना अपेक्षित गुण न मिळाल्याने त्यांना अशा प्रकारे आमिष दाखवण्याची ही एक युक्ती असल्याचे न्यायालयाने म्हटले.

महाविद्यालयाचा दावा अमान्य

तक्रारीला उत्तर देताना नियमानुसार गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी अभ्यासक्रमासाठी जागा भरता येत नाही आणि म्हणून सुरक्षित ठेव वगळता कोणतेही शुल्क परत केले जात नाही, असा दावा महाविद्यालयातर्फे करण्यात आला. त्यावर अभियंता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची जैववैद्यकीय अभियांत्रिकीला फार पसंती नसल्याचे दिसते. त्यामुळे कमी गुण मिळूनही तक्रारदाराच्या मुलाला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याचे न्यायालयाने म्हटले.

रिक्त जागा भरण्याची जबाबदारी महाविद्यालयांचीच

शेडगे यांच्या मुलाला प्रवेश देताना इतर उमेदवाराला प्रवेश नाकारण्यात आल्याचा कोणताही पुरावा महाविद्यालयाने सादर केलेला नाही. जैववैद्यकीय अभियांत्रिकीला तक्रारदाराच्या मुलाला प्रवेश देताना अन्य विद्यार्थी प्रतीक्षायादीत असल्याचेही महाविद्यालयाने दाखवून दिले नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्यामुळे महाविद्यालय जैववैद्यकीय अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्यासाठी तक्रारदाराला जबाबदार धरू शकत नाही. किंबहुना या जागा भरण्याची जबाबदारी महाविद्यालयाचीच आहे, असेही न्यायालयाने म्हटले.