मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन दिले.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्याशी तत्काळ पत्रव्यहार केला जाईल आणि त्यांना सीबीआय तपासासंदर्भात विनंती केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांचा समावेश होता.या मागणीमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करणारी सीबीआय तीसरी एजन्सी असणार आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताला २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला होता. या अपघाताची राज्य गुप्तचर विभाग (सीआयडी) आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) मार्फत चौकशी सुरु आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे. तसेच अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल न येणे आणि ब्लॅक बॉक्स खराब असणे यावर आमदार रोहीत पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अपघातानंतर २० दिवस उलटूनही अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. तसेच या विमान अपघाताचे रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यामुळे अपघात संदर्भात संभ्रम वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास केल्यास तो व्यापक व सखोल हेाईल. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना चौकशीचे निवेदन दिले आहे.राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना तपासासंदर्भात जे निवेदन दिले आहे, त्यामध्ये कोणत्या मुद्याला प्राधान्य द्यावे याची यादी दिलेली आहे.

सुनेत्रा-पार्थ पवारांनी निवेदनामध्ये उपस्थित केलेले ५ प्रश्न :

१. क्रूमध्ये शेवटच्या क्षणी बदल का करण्यात आले ?

२. हवाई वाहतूक नियंत्रण आणि धावपट्टीच्या मंजुरीमध्ये विसंगती कशी ?

३. गंभीर ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणाली आणि अखंडतेबद्दल चिंता

४. लँडिंग वेळी रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची अनुपस्थिती का ?

५. क्रू फिटनेस, विमान देखभाल, अनुपालन याकडे दुर्लक्ष का ?