scorecardresearch

मुंबई: बाळकुममधील वाहनतळाचे काम बंद; उपकंत्राटदाराने काम थांबविले

विजेत्यांची परवड सुरूच, घरांचा ताबा लांबवणीवर

मुंबई: बाळकुममधील वाहनतळाचे काम बंद; उपकंत्राटदाराने काम थांबविले
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

मंगल हनवते

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुम प्रकल्पातील १७ मजली वाहनतळाचे काम उपकंत्राटदाराने मागील काही दिवसांपासून बंद केले आहे. वाहनतळाचे काम डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. परिणामी या प्रकल्पातील विजेत्यांचा घरांचा ताबा लांबवणीवर पडला आहे. विजेत्यांना मार्च २०२३ मध्ये घरांचा ताबा देण्याचे आश्वासन कोकण मंडळाने दिले होते. आता वाहनतळाचे कामच बंद असल्याने मार्च २०२३ पर्यंत घराचा ताबा मिळण्याची शक्यता नसल्याने आता विजेत्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा >>>मुंबईः पोलिसाचाच व्हॉकीटॉकी, मोबाईल हिसकावून नेला; कधी, कसा, कुणी वाचा…

कोकण मंडळाने २०१८ मध्ये ९०१८ घरांची सोडत काढली होती. या सोडतीत बाळकुम येथील गृहप्रकल्पातील १२५ घरांचा समावेश होता. तसेच मंडळाच्या २००० च्या एका योजनेतील ६९ लाभार्थ्यांचाही समावेश या प्रकल्पात केला. त्यानुसार १९७ विजेत्यांना बाळकुम येथील गृहप्रकल्पात घरे दिली जाणार आहेत. दरम्यान, या घरांसाठी मंडळाने सोडतीनुसार ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये अशी किंमत निश्चित केली. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अचानक मंडळाने या किंमतीमध्ये थेट १६ लाख २९ हजार ५६४ रुपयांनी वाढ करून विजेत्यांना मोठा धक्का दिला. या वाढीवरून विजेते आणि मंडळात मोठा वाद रंगला असून हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. वाहनतळ, पाणीपुरवठा आणि मेट्रो उपकराचा बोजा घरांच्या किंमतीवर टाकण्यात आला आहे. मंडळाच्या चुकीचा फटका विजेत्यांना बसत असल्याने ही वाढीव रक्कम रद्द करण्याची मागणी विजेत्यांकडून होत आहे. मंडळ हा निर्णय मागे घेण्यास तयार नाही. मंडळाने आतापर्यंत विजेत्यांकडून घराची २५ टक्के रक्कम भरून घेतली असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ५० टक्के रक्कम भरण्याची सूचना केली आहे. तर उर्वरित ३५ टक्के रक्कम इमारतीस निवासी दाखला प्राप्त झाल्यानंतर भरून घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्च २०२३ मध्ये घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देऊन विजेत्यांकडून ही रक्कम भरून घेतली जात आहे.

हेही वाचा >>>मुंबई: पुन्हा भूमिगत कचरापेट्या, कफ परेडमध्ये झाडांची कत्तल करून भूमिगत कचरापेट्यांसाठी जागा

घरांची २५ टक्के रक्कम भरलेल्या आणि १६ लाखांचा बोजा पडलेल्या विजेत्यांची चिंता आता आणखी वाढली आहे. मार्च २०२३ मध्ये घराचा ताबा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. या प्रकल्पातील १७ मजली तीन वाहनतळाचे काम पूर्ण केल्याशिवाय ठाणे महानगरपालिकेकडून निवासी दाखला दिला जाणार नाही. तर निवासी दाखला मिळाल्याशिवाय ताबा मिळणार नाही. असे असताना या वाहनतळांचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही वाहनतळाचे अंदाजे ३० टक्के काम अपूर्ण आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून हे काम पूर्णत: बंद आहे. मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला असून आता मुख्य कंत्राटदाराने दुसऱ्या उपकंत्राटाची नियुक्ती केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या उपकंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरूवात होईल आणि काम पूर्ण केले जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन – तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च २०२३ पर्यंत ताबा देणे शक्य नसून ताबा देण्यास विलंब होईल, असेही स्पष्ट केले आहे.

निवासी दाखला मिळाल्यानंतरच उर्वरित रक्कम घ्यावी
मुळात १६ लाखांनी किंमती वाढवून आमच्यावर म्हाडाने अन्याय केला आहे. यासंबंधीचा निर्णय रद्द करण्यास कोकण मंडळ तयार नसले तरी आम्ही या मागणीवर ठाम असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत. आता वाहनतळाचे काम बंद असल्याने ताबा लांबणीवर पडला आहे. एकूणच म्हाडा आमच्या अडचणी वाढवत आहे. त्यामुळे कोकण मंडळाने उर्वरित रक्कम आता निवासी दाखला मिळाल्यानंतरच भरून घ्यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी मंडळाकडे करण्यात येईल, असे या सोडतीमधील एका विजेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 12:48 IST

संबंधित बातम्या