झोपडपट्टय़ांतील शौचालय उभारणी रद्द

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पालिकेने संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांसाठी तब्बल २२ हजार ७७४ शौचकूपे म्हणजेच ११६७ शौचालये बांधण्याचा ‘लॉट ११’ प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाकांक्षी योजनेत तीन वर्षांत ५६ टक्केच काम पूर्ण

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पालिकेने संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांसाठी तब्बल २२ हजार ७७४ शौचकूपे म्हणजेच ११६७ शौचालये बांधण्याचा ‘लॉट ११’ प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा प्रकल्प गुंडाळण्याची तयारी प्रशासन पातळीवर सुरू झाली आहे.

धोकादायक शौचालये पाडून त्याजागी नवी शौचालये बांधणे, काही ठिकाणी नवी शौचालये बांधण्याचा पालिकेचा मानस होता. मात्र तीन वर्षे झाली तरी केवळ ५६ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पातील काही ठिकाणी बांधण्यात येणारी नवी शौचालये रद्द करण्यात येणार आहेत. 

मुंबईतील उघडय़ावरील हागणदारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत थोडीथोडकी नाही तर तब्बल ११६७ शौचालये  म्हणजेच २२ हजार शौचकूप बांधण्याचे लक्ष्य ठेवले होते. जुन्या १४ हजार १७३ शौचकुपांच्याच जागेत १६ हजार ७०३ शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार होते. याव्यतिरिक्त ६ हजार ७१ शौचकुपे  पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार होती. पालिकेने या कामासाठी ४२२ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. जानेवारी २०१९ मध्ये पालिकेने या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावही मंजूर केला होता. कार्यादेश दिल्यापासून ९ ते १२ महिन्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे आतापर्यंत १२ हजार ८०९ शौचाकूपांचे काम पूर्ण झाले असून अजून सहा हजार ६४८ शौचकूपांचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करून हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार आहे.

जानेवारी २०१९ मध्ये पालिकेने या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली व स्थायी समितीने प्रस्तावही मंजूर केले होते. कार्यादेश दिल्यानंतर ९ ते १२ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या शौचालयांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. काही ठिकाणी ही शौचालये अन्य प्राधिकरणांच्या जागेत प्रस्तावित होती, तिथे त्या प्राधिकरणांची मंजुरी मिळू शकली नाही. तर काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या नसल्यामुळे शौचालय बांधणे शक्य नव्हते. काही ठिकाणी रहिवाशांनीच विरोध केला. काही ठिकाणी टाळेबंदीमुळे काम रखडले तर कधी आचारसंहितेमुळे काम रखडले, तर कुठे कामाचा कालावधी उलटून गेला अशा अनेक कारणांमुळे ही शौचालये होऊ शकली नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

कोणतेही सर्वेक्षण न करता हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी शौचालयाचे काम पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या मंजुरीनेच हा प्रकल्प थांबण्यात आला आहे.

संगीता हसनाळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Construction toilets slums canceled ysh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या