डिश आणि सेट टॉप बॉक्स जोडणीच्या खर्चासह एक वर्षांच्या सेवेची आगाऊ रक्कम भरूनही सेवेत कुचराई करणे ‘रिलायन्स बिग टीव्ही प्रा. लि.’ला महागात पडले. या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने कंपनीला दोषी ठरविले आहे. संबंधित ग्राहकाने कंपनीला दिलेली आगाऊ रक्कम सव्याज परत करण्यासह मानसिक त्रासाची भरपाई म्हणून १५ हजार रुपये, तर कायदेशीर खर्चाचे पाच हजार असे एकूण २५ हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
दादर येथील शेखर पाठारे यांनी रिलायन्स बिग टीव्ही विरोधात केलेल्या तक्रारीवर ग्राहक न्यायालयाने हे आदेश दिले. तक्रारीनुसार, पाठारे यांनी रिल्यान्स बिग टीव्हीकडून घरी डीश तसेच दोन सेट बॉक्स बसवून घेतले होते. या सेवेसाठी त्यांनी कंपनीला २६०० रुपयांसह पहिल्या रिचार्जसाठीचे ५०० रुपये दिले होते. या दोन डीटीएच सेवेतील पहिल्या टीव्हीसाठी २१०  रुपये, तर दुसऱ्या टीव्हीसाठी १०५ रुपये असे प्री-पेड पद्धतीने हे मासिक शुल्क निश्चित करण्यात आले होते. परंतु वर्गवारी न करताच कंपनी हे शुल्क पाठारे यांच्याकडून वसूल करू लागली. त्याबाबत तक्रार केल्यावर कंपनीने चूक मान्य करत ती सुधारली. जून २०१२ मध्ये पाठारे यांनी एक वर्षांची आगाऊ रक्कम भरूनही कंपनीने एप्रिल २०१३ मध्ये त्यांच्या दोन्ही टीव्हींची डीटीएच जोडणी खंडीत केली. तक्रार केल्यावर कंपनीने ही सेवा पूर्ववत केली. परंतु १५ जुलै २०१३ रोजी सेवा पुन्हा खंडीत करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवडय़ात पाठारे परदेश दौऱ्यावर गेले होते. ते परतले तेव्हा डीटीएच सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा तक्रार केली आणि सेवे पुन्हा पूर्ववत करण्यात आली. मात्र त्यानंतरही वाहिन्यांबाबतचा घोळ सुरूच राहिल्याने पाठारे यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. सेट टॉप बॉक्सचे स्मार्टकार्ड अनलॉक करण्याचे आदेश कंपनीला देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय खंडीत सेवेद्वारे मानसिक त्रास दिल्याबद्दल २५ हजार रुपयांच्या भरपाईचीही मागणी केली. कंपनीतर्फे आरोपांना आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने कंपनीला सेवेत कुचराई केल्याबाबत दोषी ठरवून पाठारे यांना भरपाई देण्याचे आदेश दिले.