मुंबई : उन्हाळय़ामुळे पंखे-वातानुकूल यंत्रणा मोठय़ा प्रमाणात वापरल्याने वाढलेल्या वीजवापराच्या दणदणीत वीजदेयकांबरोबरच या महिन्यात अतिरक्त सुरक्षा ठेव जमा करण्यासाठीचे देयक हाती पडल्याने वीजग्राहकांचे धाबे दणाणले आहे. शहरांमध्ये या अतिरिक्त सुरक्षा ठेवीपोटी सामान्य ग्राहकांनाही दोन-चार हजारांचा बोजा पडणार असल्याने ही रक्कम सहा महिन्यांत समान हप्तय़ात भरण्याची मुभा महावितरणने दिली आहे.

वीजवितरण कंपनीकडून प्रत्येक ग्राहकाकडून मागील १२ महिन्यांच्या वीजवापराच्या सरासरीनुसार एक महिन्याची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. मात्र नव्या नियमानुसार आता दोन महिन्यांच्या वीजदेयकाची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घ्यावी लागणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या वीजदेयकाबरोबरच या नव्या नियमानुसार अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे देयक लोकांच्या हाती देण्यात आले. आधीच उन्हाळय़ामुळे पंखे-वातानुकूलन यंत्रणा जास्त वापरल्याने एप्रिलची वीजदेयके मागील महिन्याच्या तुलनेत चांगलीच फुगली आहेत. वाढीव वीजवापराचा हा वाढीव भुर्दंड सामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात या अतिरिक्त सुरक्षा ठेवीपोटी मध्यमवर्गीय ग्राहकांनाही दोन ते चार हजारांची देयके पाठवण्यात आली आहे. वाढलेल्या वीजदेयकांबरोबरच हा दोन-चार हजारांचा बोजा पडणार असल्याने वीजग्राहकांचे धाबे दणाणले आहे. अनेक जण एकमेकांकडे चौकशी करू लागले आहेत.

अतिरिक्त सुरक्षा ठेवीमुळे महावितरणला जवळपास ७ ते ७५०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. पण इतका मोठा बोजा ग्राहकांवर टाकणे योग्य नाही अशी भूमिका घेत त्याचे हप्ते पाडून देण्यााची मागणी राज्य वीजग्राहक संघटनेने केल्यानंतर आता महावितरणने सुरक्षा ठेवीची रक्कम सहा हप्तय़ांत देण्याची मुभा वीजग्राहकांना दिली आहे.

अदानी पॉवरकडूनही सहा हप्तय़ांची सवलत

अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा एकरकमी बोजा वीजग्राहकांवर पडू नये यासाठी मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या अदानी पॉवरने सहा समान हप्तय़ांत ही रक्कम भरण्याची सवलत ग्राहकांना दिली आहे.