मुंबई : न्यायव्यवस्थेवरील टीकेप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ‘इंडियन बार असोसिएशन’ने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही प्रतिवादी करण्यात आले असून या सगळय़ांवर न्यायालयावरील टीकेप्रकरणी अवमान कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्यानंतर न्यायालयात भाजप नेत्यांनाच दिलासा कसा मिळतो, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. तसेच न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर इंडियन बार असोसिएशनने ही याचिका करून प्रतिवाद्यांवर अवमान कारवाईची मागणी केली आहे.
सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात डांबण्याचा किंवा त्यांचा छळ करण्याचा प्रतिवाद्यांचा डाव या न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फसला आहे. त्यामुळेच न्यायालयाने दिलेले निकाल विरोधात गेल्याने मंत्रीपदी असलेले प्रतिवादी संपूर्ण न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याच्या मोहिमेत गुंतले आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.