मुंबई : राज्यामध्ये गुइनेल बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून, रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.
राज्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या १०१ झाली आहे. सोलापूरमध्ये एक संशयित मृत्यू झाला आहे. जीबीएसचे सर्वाधिक म्हणजे ८१ रुग्ण हे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात सापडले आहेत. त्याखालोखाल पिंपरी चिंचवडमध्ये १४ आणि अन्य जिल्ह्यांमध्ये सहा रुग्ण आहेत. त्यात ६८ पुरुष व ३३ महिला असून, १६ रुग्ण जीवन रक्षक प्रणालीवर आहेत. पुण्यात घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून आजपर्यंत २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सोलापूरमधील बाधित व्यक्ती पुण्यात आली होती, याठिकाणी ‘जीबीएस’ची लागण झाल्याचा संशय असून, नंतर तिचा सोलापूरमध्ये मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जीबीएस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने सात तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यास मदत करेल. तसेच राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही ही समिती लक्ष ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘बाधित जिल्ह्यांतील भागांत सर्वेक्षण करा’
जीबीएसला प्रतिबंध करण्यासाठी राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट देऊन बाधित जिल्ह्यातील भागांत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांचे शौच आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील काही नमुन्यांमध्ये नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे बाधित जिल्ह्यातील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळविण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांनाही देण्यात आल्या आहेत.