मुंबई : ‘बेस्ट’च्या अधिकाधिक गाडय़ा रस्त्यावर धावाव्यात यासाठी उपक्रमात कंत्राटी पद्धतीने ४०० वाहकांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत कडाडून विरोध करण्यात आला. सर्वच सदस्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केल्या. मात्र महाव्यवस्थापकांच्या गैरहजेरीमुळे यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

बेस्टच्या बसगाडय़ांची संख्या वाढत असली तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे दररोज १२५ बसगाडय़ा धावत नाहीत. त्यामुळे प्रथम कंत्राटी वाहक भरती करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. मात्र या प्रस्तावाला बेस्ट समिती सदस्यांनी विरोध केला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रविराजा यांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. तर शिवसेनेचे सुहास सामंत आणि भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनीही प्रस्तावाला विरोध करत रद्द करण्याची मागणी केली. अखेर हा  प्रस्ताव रद्द करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली.