मुंबई : वेळेत न मिळणारे वेतन आणि अन्य देणी थकविल्याच्या निषेधार्थ बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बस चालविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्याचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना वेळेवर बस मिळू न शकल्याने अनेकांना रेल्वे स्थानक गाठण्यास, तसेच कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

बेस्टने कंत्राटी पद्धतीने भाडेतत्वावर घेतलेल्या बसची प्रवाशांना डोकेदुखी होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यात एकाच कंपनीच्या कंत्राटी चालकांकडून आंदोलन करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकरांकडून होऊ लागली आहे.

बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बससाठी सहा कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून या कंत्राटदारांच्या भाडेतत्वावरील बस विविध मार्गावर धावत आहेत. या बस चालविण्यासाठी कंत्राटदाराने कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एमपी ग्रुप या कंत्राटदारानेही कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती केली असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना विलंबाने वेतन मिळत आहे. शिवाय त्यांची अन्य देणीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या कंत्राटी चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले.

परिणामी कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या आगारांतून विविध मार्गावर बस सुटू शकल्या नाहीत. सकाळी ११ वाजेपर्यंत २७६ बसपैकी ११२ बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. तर १६३ बस सेवेत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी वेळेत बस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे बराच वेळ प्रवाशांना बस थांब्यावर ताटकळत राहावे  लागले. रेल्वे स्थानक किंवा कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेकांना रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडावा लागला.

वांद्रे रेक्लमेशन, पाली हिल नाका, वडाळा रेल्वे स्थानक येथून हिदुस्थान कंपनी, गांधीनगर, गोदरेज कॉलनी, कन्नमवार नगरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसगाडय़ा उपलब्ध न झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. तसेच कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर बससाठी आलेल्या प्रवाशांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी बेस्टने स्वमालकीच्या ९४ बस सोडल्या. संध्याकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

केवळ दंडात्मक कारवाई

बेस्ट उपक्रमाकडून आतापर्यंत भाडेतत्त्वावर बेस्ट बस उपलब्ध करणाऱ्या आणि चालकांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही कंत्राटी चालकानी आंदोलन सुरूच ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उपक्रमाने न चालवलेल्या प्रत्येक बसमागे पाच हजार रुपये दंड केला आहे. मंगळवारी १६३ पेक्षा जास्त गाडय़ा धावू शकल्या नाहीत. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली. चौथ्यांदा आंदोलन झाल्याने उपक्रमाकडून कंत्राटदारावर कारवाईसाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही वराडे यांनी स्पष्ट केले.

..म्हणून आंदोलन

बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर अनेक मिडी, मिनी, वातानुकूलित बस चालविल्या जातात. त्यासाठी बससेवा चालविणाऱ्या कंत्राटदारांना प्रत्येक किलोमीटरमागे विशिष्ट रक्कम दिली जाते. त्यातून, संबंधित कंत्राटदारांना चालकांना वेतन, इंधन, देखभाल आदी खर्च करावा लागतो. मात्र, एका कंत्राटदाराने काही महिने पगार न दिल्याने कंत्राटी चालकांनी आंदोलनाचे पाऊल उचलले.