मुंबई : भाडेतत्त्वावरील बस आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या एमपी ग्रुप या कंत्राटदारास बेस्ट उपक्रमाने कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणे, त्यांची अन्य थकित रक्कम वेळेवर न दिल्याने कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सध्या या ग्रुपच्या २८० पैकी २६६ मिनी बसही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकूणच या सर्व प्रकाराची दखल घेऊन उपक्रमाने कंत्राट रद्द करण्याची नोटीस दिली आहे.

मुंबईकरांच्या सेवेत सध्या मोठय़ा आकाराच्या बस बरोबरच भाडेतत्त्वावरील मिनी बसही आहेत. विविध कंत्राटदारांकडून ही सेवा दिली जाते. यापैकी बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणारी कंत्राटदार कंपनी एमपी ग्रुपच्याही २८० बसचा समावेश आहे. चालकांचे वेतन थकण्याबरोबरच मिनी बसमधील वातानुकूलित यंत्रणा योग्य नसणे आणि त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न उद्भवल्याने प्रवाशांकडून तक्रारीही केल्या जात होत्या. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.