मुंबई : राज्यातील विविध शासकीय विभागांकडील कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची देयके दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रलंबित देयकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कंत्राटदार मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना दूरध्वनी करून जाब विचारणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी एकाच वेळी लाखो फोन करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे २७ हजार कोटी रुपये, जलजीवन मिशनची ३८ हजार कोटी रुपये, आदिवासी विभागाची १२ हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभागाची ३५०० कोटी रुपये आणि पर्यटन विभागाची २५०९ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. याशिवाय जलसंपदा, जलसंधारण आणि नगरविकासासह अन्य विभागांकडील देयकेही रखडली आहेत. या थकबाकीमुळे राज्यातील सुमारे तीन लाख कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी घटकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
गेल्या वर्षभरात सुमारे नऊ ते दहा कंत्राटदारांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचेही संघटनांनी म्हटले आहे. या गंभीर प्रश्नावर वारंवार आंदोलने, धरणे आणि मोर्चे काढण्यात आले. मंत्रालयात संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेऊनही ठोस निर्णय झाला नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घ्यावी, अशी दहा वेळा विनंती करूनही वेळ मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळत नसल्याने आर्थिक कोंडी अधिक गंभीर झाली आहे. शासनाकडे निधी नसल्याचे चित्र असून, मंत्री आणि सचिवांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता थेट दूरध्वनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला उत्तर देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, प्रकाश पालरेचा, अनिल पाटील, सुरेश कडू पाटील, प्रकाश पांडव, अभियंता संघटनेचे महासचिव राजेश देशमुख तसेच पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष शरद पाटील, आनंद तोडकरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही भूमिका मांडली आहे. प्रलंबित देयकांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
