Premium

अजित पवार – संजय राऊत यांच्यात पुन्हा कलगीतुरा; महाविकास आघाडीत विसंवादाचे चित्र

कोण संजय राऊत, असा खोचक प्रश्न करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊत यांच्या थुंकण्यावरून टीका करताच राऊत यांचीही जीभ घसरली.

sanjay raout and ajit pawar
( संजय राऊत-अजित पवार )

मुंबई : कोण संजय राऊत, असा खोचक प्रश्न करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊत यांच्या थुंकण्यावरून टीका करताच राऊत यांचीही जीभ घसरली. यामुळे महाविकास आघाडीत एकी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना पवार आणि राऊत यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यमांसमोर संजय राऊत थुंकले होते. यावरून राऊत यांच्यावर टीकाही झाली. मग राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी थुंकलो नव्हतो वगैरे खुलासा केला.
राऊत यांच्या थुंकण्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संजय राऊत किंवा कोणीही बोलताना संयम राखला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर खालच्या थरावर जाऊन टीका करण्याची राज्याची संस्कृती नव्हे, असे खडे बोलही अजित पवार यांनी राऊत यांना सुनावले होते. त्यावर ‘धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले’, असे प्रत्युत्तर राऊत यांनी पवार यांना दिले. मागे अजित पवार यांनी धरणात पाणी सोडण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. हा संदर्भ घेत राऊत यांनी अजित पवार यांना सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले काही दिवस अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. राष्ट्रवादीबद्दलच्या राऊत यांच्या भूमिकेवरून अजित पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. तसेच कोण संजय राऊत? असा सवालही जाहीरपणे केला होता. राऊत हे कायम शरद पवार यांच्या संपर्कात असतात. किंबहुना महाविकास आघाडीचा प्रयोग पवार आणि राऊत यांच्यामुळेच आकारास आला होता. पण राऊत आणि अजित पवार यांच्यात अजिबात समन्वय नसल्याचे सातत्याने अधोरेखित होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Controversy again between ajit pawar and sanjay raut amy