सत्तेत असताना परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी न सोडणारे काँग्रेस नेते पराभवातूनही फारसे काही शिकलेले नाहीत. याचे ताजे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेवरील बंदीवरून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपापल्या पक्षांतर्गत विरोधकांच्या विरुद्ध जुने हिशेब चुकते करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांला अटक झाल्यापासून राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये परस्परांवर शेकविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठाण्यातील बॉम्बस्फोटानंतर पाठविला होता, पण केंद्राने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आलाच नव्हता, असा पलटवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. शिंदे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध सर्वश्रूतच आहेत. ‘आदर्श’ घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग नेमून पृथ्वीराज चव्हाण यांनी मागे शिंदे यांना अडचणीत आणले होते. तर चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दलही शिंदे यांनी उघडपणे नापसंती व्यक्त केली होती.
सनातनच्या बंदीचा प्रस्ताव पाठविला होता, असे पृथ्वीराज चव्हाण सांगत असताना, आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात तसा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज आणि अशोक या दोन चव्हाणांमधील संबंध नेहमीच ताणलेले राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनीच विरोध दर्शविला होता. सनातनप्रकरणी अशोक चव्हाण यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुरघोडी करण्याकरिता शिंदे यांच्या भूमिकेची री ओढली. दिल्ली दरबारी पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यपद्धतीबद्दल पक्षनेतृत्वाकडे तक्रारी केल्याचे समजते.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातही दुरावा निर्माण झाला आहे. विखे-पाटील यांनी काही मुद्दय़ांवरून घेतलेली भूमिका चव्हाण यांना मान्य नव्हती. विधानसभेत विखे-पाटील सरकारबद्दल काहीशी मवाळ भूमिका घेतात, असा चव्हाण यांचा आक्षेप असल्याचे समजते. दुष्काळाच्या मुद्दय़ावरही चव्हाण आणि विखे-पाटील यांच्यात एकवाक्यता दिसली नाही. हा सारा गोंधळ सुरू असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरील भूमिका किंवा दुष्काळी दौरा यात पक्षाच्या नेत्यांना विश्वासातच घेतले नव्हते, असेही समोर आले आहे. एकूणच काँग्रेसमध्ये सध्या सारा घोळच घोळ सुरू आहे.