मुंबई : हाजी अली येथे असलेल्या डबेवाला कामगाराचा पुतळा पत्रे लावून झाकण्यात आला असून हा पुतळा अन्यत्र हलविण्यात येणार असल्याची भीती डबेवाल्यांच्या संघटनेने व्यक्त केली. या वाहतूक बेटाची देखभाल करण्यासाठी नव्या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून या कंपनीला हा पुतळा तेथे नकोसा झाला आहे, असा आरोप डबेवाल्यांच्या संघटनेने केला आहे.

हा पुतळा येथून हटवू नये, असे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाला दिले आहेत.

काही वर्षांपूर्वी मुंबई पालिकेने हाजीअली येथील चौकात डबेवाला कामगाराचा पुतळा उभारला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे या पुतळ्याला दरवर्षी १ मे रोजी वंदन करण्यात येते.

हेही वाचा…मुंबई : शशांक राव यांचा भाजपमध्ये प्रवेश संघटना संभ्रमात

यावर्षीही संघटनेतर्फे वंदन करण्यासाठी काही पदाधिकारी तेथे गेले असता हा पुतळा पत्रे लावून झाकण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे हा पुतळा येथून हटवण्याचे कारस्थान सुरू आहे का, अशी शंका डबेवाला कामगार संघटनेने व्यक्त केली आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले की, या वाहतूक बेटाची देखभाल करण्याचे काम अन्य कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीला हा पुतळा तेथे नकोसा झाला आहे व त्यांना त्यांची जाहिरात तेथे करायची आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी हा पुतळा येथून हटवण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप तळेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

हेही वाचा…मुंबई: पोलीस प्रशिक्षणार्थींच्या जेवणात अळी, संबंधित कॅटरर्सवर कारवाईचे आदेश

पालकमंत्र्यांच्या सूचना

● हा पुतळा म्हणजे मराठी कामगार यांची अस्मिता आहे आम्ही हा पुतळा येथून हटवू देणार नाही. वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा डबेवाल्यांच्या संघटनेने दिला आहे. तसेच हा पुतळा हटवू नये, अशी मागणी संघटनेने सर्वपक्षीय राजकारण्यांकडे केली आहे.

हेही वाचा…पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाबाबत ‘पोस्ट’, मुख्याध्यापिकेवर राजीनाम्यासाठी सक्ती

● याप्रकरणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी डी विभगाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र पाठवून हा पुतळा तेथून हटवू नये अशी सूचना केली आहे.