मुंबई – मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपने महापौर पदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्या नावावरून एक वेगळाच वाद रंगला आहे. रितू तावडे या मूळच्या कॉंग्रेसच्या पदाधिकारी होत्या. बाहेरून आलेल्या नगरसेविकेला महापौर पद दिल्यामुळे पक्षातील अन्य नगरसेविकांमध्ये डावलल्याची भावना निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली आणि १६ जानेवारीला निकाल लागला. निकाल लागून वीस पंचवीस दिवस झाले तरी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला सुरूवात झाली नव्हती. अखेर ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अनेक नगरसेविकांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यात तेजस्वी घोसाळकर, राजेश्री शिरवडकर, शीतल गंभीर, प्रीती सातम यांच्यासह रितू तावडे यांचेही नाव चर्चेत होते.

तेजस्वी घोसाळकर या नुकत्याच शिवसेनेतून भाजपमध्ये आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाला आधीच छुपा विरोध होऊ लागला होता. अखेरीस सगळी नावे बाद करून भाजपने रितू तावडे यांच्या नावाची आयत्यावेळी घोषणा करून महापौर कोण होणार याची उत्सुकता मिटवली. मात्र अद्याप महापौर पदाची अधिकृत घोषणा सभागृहात होत नाही तोच रितू तावडे यांच्या नावावरून भाजपवर टीका होऊ लागली आहे.

रितू तावडे या मूळच्या कॉंग्रेस पक्षातील आहेत. कॉंग्रेसमध्ये असताना घाटकोपर विधानसभा महिला विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१२ मध्ये त्यांना कॉंग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१२ मध्ये त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. भाजपने त्यांना शिक्षण समितीचे अध्यक्षपद दिले होते. २०१७ ची पालिका निवडणूक त्या हरल्या होत्या.

२०२६ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या असून आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची भाजपच्या महापौर पदी निवड झाली आहे. परंतु भाजपला इतक्या वर्षांनी सत्ता मिळाल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या रितू तावडे यांना भाजपने महापौर पदावर बसवल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक महिला नगरसेविका भाजपमध्ये पण अनुभवी नगरसेविका ठाकरेंकडे यंदा मुंबई महापालिकेवर तब्बल १३० नगरसेविका निवडून आल्या आहेत. एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा १३० महिला निवडून आल्या आहेत.

मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक ४९ नगरसेविका भाजपच्या आहेत. मात्र त्यात अनुभवी नगरसेविकांची कमतरता असल्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत मोजकीच नावे होती. मात्र गेली पंचवीस तीस वर्षे सत्ता असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर अशा अनेक अनुभवी नगरसेविका आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे एकूणच अनुभवी नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सगळ्यांसमोर सभागृहात रितू तावडे यांचा कस लागणार आहे.