अभिनेत्री दिया मिर्झाच्या एका व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत महापौर विरूद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला आहे. दिया मिर्झाने एका व्हिडीओ संदेशात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, फटाक्यांमुळे प्रदूषण होतं असं म्हटलं होतं. त्या व्हिडीओवरून आधी प्रसाद लाड संतापले त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे आक्रमक झाल्या. प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतरच दिया मिर्झाचा व्हिडीओ महापालिकेच्या एक्स हँडलवरून डिलिट करण्यात आला. दरम्यान या सगळ्या प्रकरणी दिया मिर्झाने प्रतिक्रिया दिली आहे.
दिया मिर्झाने काय प्रतिक्रिया दिली आहे?
“मी जो व्हिडीओ केला होता तो प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी होता. त्यामध्ये टीका करण्यासारखं नेमकं काय आहे? सन्मानीय मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने मी तो व्हिडीओ केला होता. प्रदूषण कमी व्हावं आणि लोकांचं आरोग्य योग्य रहावं यासाठी तो व्हिडीओ केला होता, त्यात खटकण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं काय आहे असं दिया मिर्झाने ANI कडे म्हटलं आहे. “
नेमकं प्रकरण काय?
पावसाळा संपताच मुंबईच्या वायु प्रदुषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदुषण टाळा, असं दिया मिर्झा हिने व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र महापालिकेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला. ज्यानंतर हा व्हिडीओ डिलिट करण्यात आला.
दिया मिर्झाने व्हिडीओत काय म्हटलं होतं?
नमस्कार, दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हा व्हिडीओ महापालिकेने डिलिट केला असला तरीही एक्स पेजवर तो आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. याच व्हिडीओवरून महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झा हिंदू विरोधी असल्याची टीका केली आहे.
महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
दिया मिर्झांनी हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांशी हातमिळवणी केली आहे. नर्मदा प्रकल्पाच्या विरोधात दिया मिर्झा यांनी भूमिका मांडली. हिंदू धर्माच्या सणांना त्या ट्रोल करत आहेत. लक्झरी कार आणि प्रायव्हेट विमानांतून फिरताना कार्बन फूट प्रिंटचा विसर दिया मिर्झाला पडतो. पण इतर गोष्टींवर त्या नेहमी बोलतात. म्हणजेच त्या सिलेक्टिव्ह अजेंडा घेऊन बोलतात. हिंदू विरोधी भूमिका त्या कायम मांडतात. त्यामुळे दिया मिर्झा यांच्या भूमिकेला आम्ही विरोध दर्शवला आहे. दिया मिर्झा यांनी केलेला व्हिडीओ आम्हाला मान्य नाही. कारण त्यांनी कायमच हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे. दिवाळी कशी साजरी करायची हे त्यांनी सांगू नये आम्ही त्यांना ब्लॅक लिस्ट केलं आहे. असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.
