मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत पालिका प्रशासनाने एक मत्स्यालय उभारण्याचे ठरवले असून त्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. तसेच मत्स्यालयाचे नियोजन चुकीचे असल्यामुळे अपघाताचा धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र पालिका प्रशासनाने रईस शेख यांचे आरोप फेटाळले असून या कामाचे कंत्राट नियमानुसार दिले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. पेंग्विन कक्षाच्या समोरच हे मत्स्यालय होणार आहे. तसेच मत्स्यालयाच्या प्रवेशद्वारावर छतामधील घुमटाकार मत्स्यालय तयार करण्यात येणार आहे. त्याकरीता निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे. ही निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी तसेच निविदा, बोली, मंजुरी प्रक्रियेची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आरोप काय आहेत?
मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे, या प्रकल्पात अग्निसुरक्षा, सार्वजनिक धोके यांचा विचार करण्यात आलेला नाही. अतिशय कमी जागेत हे मत्स्यालय होणार आहे. त्यामुळे गर्दी व चेंगराचेंगरी होऊ शकते. तसेच या निविदेच्या प्रक्रियेत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत. निविदेत केवळ एका बोलीदाराने भाग घेतला होता. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल शंका आहेत. स्पर्धा रोखण्यासाठी निविदेत फेरफार करण्यात आला असावा. बोली लावणारी कंपनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कंपनी असल्याने सदर प्रकरण चिंताजनक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. या प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ही रक्कम जास्त आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या ठिकाणी राज्य सरकारच्यावतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुमजली मत्स्यालय विकसित केले जाणार आहे. दक्षिण मुंबईत ५ किलोमीटरच्या परिघात दुसरे मत्स्यालय होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प अनावश्यक असल्याचा आरोपही आमदार रईस शेख यांनी केला आहे.
प्रशासनाने आरोप फेटाळले
पालिका प्रशासनाने शेख यांचे आरोप फेटाळले आहेत. हे मत्स्यालय उभारण्यासाठी सल्लागारांकडून सुरक्षिततेविषयी सर्व उपाययोजना करून घेण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटकांचा जाण्याचा मार्ग हा एक दिशेने असल्यामुळे इथे चेंगराचेंगरीचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी प्रथम निविदा मागवल्या तेव्हा एकच निविदाकार आले होते. त्यामुळे पुनर्निविदा मागवण्यात आल्या. त्यात आलेल्या दोन निविदाकारांमधून कंत्राटदार नियमानुसार निश्चित करण्यात आले आहेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ६५ कोटीमध्ये केवळ मत्स्यालयच नाही तर पेंग्विन कक्षाचे विस्तारीकरण व अन्य कामेही केली जाणार आहेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
विदेशी प्राणी आणण्यासाठी मत्स्यालय आवश्यक
उद्यानाच्या जवळ पालिकेने अधिग्रहित केलेल्या जागेवर विदेशी प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मात्र केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार स्थानिक प्राणी व विदेशी प्राणी यांचा समतोल साधावा लागतो. विदेशी प्राणी आणण्यासाठी स्थानिक प्राण्यांची संख्या वाढवावी लागते. जागेची मर्यादा लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने पाण्यातील प्रजातींची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हे मत्स्यालय उभारले जात असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.