मुंबई: जुहू येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत असून या रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना अतिशय तुसडेपणाची व तिरस्काराची वागणूक देत असतात. रुग्णालयात स्वच्छता आणि देखभालीची वानवा आहे. रुग्णालयातील या उणीवांची मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दखल घेतली. त्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची मागणी साटम यांनी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
पालिकेच्या कूपर रुग्णालयातील आरोग्य सुविधामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज त्यांनी केली आहे. महापौर रितू तावडे व पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना शुक्रवारी पाठवलेल्या पत्रात आमदार साटम यांनी रुग्णालयाशी संबंधित अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. तत्पूर्वी, त्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, तसेच आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत अमित साटम यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असून क्षमता-बांधणी कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीने रुग्णालयाची आणि पर्यायाने पालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे ते म्हणाले.
वैद्यकीय उपकरणांची खरेदी जेम पोर्टलवरून
निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे कूपर रुग्णालयाला जवळपास दोन वर्षे डिजिटल रेडिओग्राफी उपकरणांपासून वंचित राहावे लागले. सप्टेंबर २०२४ मध्ये मोबाइल डिजिटल रेडिओग्राफी यंत्रांसाठी निविदा काढण्यात आली. परंतु एकच निविदाधारक उपलब्ध असल्याने आयुक्तांनी एप्रिल २०२५ मध्ये पुन्हा निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. तरी, विभागाने निविदा काढली नाही आणि हा विषय मार्च २०२६ पर्यंत प्रलंबित ठेवला. त्यानंतर ‘जेम’ (जेम) पोर्टलवरून सर्व वैद्यकीय उपकरणे व संबंधित साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय होऊनही विभागाने ‘जेम’ पोर्टलवर निविदा काढली नाही.
एकमेव निविदाधारकालाच कंत्राट देण्याचा आग्रह धरला. परिणामी, कूपर आणि सायन रुग्णालयांना दोन वर्षे डिजिटल यंत्रांपासून वंचित राहावे लागले. ही उपकरणे त्वरित कूपर आणि शीव रुग्णालयांच्या सेवेत आणली जातील याबाबत पावले उचलली जावीत आणि विलंबाबाबत चौकशी करावी , अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
केमोथेरपी केंद्र
पश्चिम उपनगरातील कर्करोग रुग्णांची सोय करण्यासाठी, प्रस्तावित केमोथेरपी केंद्र लवकर कार्यान्वित करावे. तसेच, बाहेर जन्मलेल्या बालरुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करावी व अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.
