मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुंबईतील नागरिकांना घराजवळ उपचार उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने कूपर रुग्णालयामध्ये केमोथेरपी उपचार केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरासह वसई, विरार व पालघरमधील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम उपनगरातील कर्करोगग्रस्तांना केमोथेरपीसारख्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयामध्ये जावे लागते. केमोथेरपी केल्यानंतर रुग्णांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. रुग्णांची होणारी ही गैरसोय लक्षात मुबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये स्वतंत्र केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कूपर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या ‘सी’ विंगमध्ये चौथ्या मजल्यावर उभारण्यात येत असलेल्या या केंद्रासाठी आवश्यक तयारी झाली असून, इलेक्ट्रिक, डॉक्टर रुम, रुग्णांसाठी खाटा यांचे नियोजन करण्याचे काम सध्या सुरू आहे.
महिनाभरामध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये ११ रुग्ण दाखल
या विभागासाठी कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रेया गट्टाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी महिनाभरापूर्वी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. हा बाह्यरुग्ण विभाग दर मंगळवारी दुपारी १.३० वाजता असतो. डॉ. श्रेया या आठवड्यातील पाच दिवस प्रत्येक रुग्ण कक्षामध्ये जाऊन तेथील रुग्णांची माहिती घेत आहेत. महिनाभरामध्ये या बाह्यरुग्ण विभागामध्ये ११ रुग्ण उपचारासाठी आले असून, त्याची तपासणी व समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे. उपचारासाठी आलेल्या ११ रुग्णांपैकी एका रुग्णावर केमोथेरपी उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित १० जणांच्या विविध तपासण्या सुरू आहे. केमोथेरपीसाठी रुग्णांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
औषधासाठी ट्रस्टचे सहकार्य
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील असतात. केमोथेरपीच्या एका चक्रासाठी साधारणपणे २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. असे अनेक चक्र करावे लागत असल्याने हा खर्च साधारणपणे ३ लाखांपासून २५ लाखांपर्यंत येतो. त्यामुळे रुग्णांना कर्करोगावरील उपचार परवडणारे नसतात. ही बाब लक्षात घेत रुग्णांना औषधोपचारासाठी बुधराणी ट्रस्टकडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे रुग्णांना केमोथेरपीसाठी कोणताही आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही.
