मुंबई : महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी अनेक रुग्णांना ‘क्ष’ किरण काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र रुग्णालयामध्ये ‘क्ष’ किरण काढण्यासाठी असलेल्या तीनही यंत्रे बंद आहेत. त्यामुळे काही रुग्णांची ‘क्ष’ किरण तपासणी ही पोर्टेबल यंत्राद्वारे काढण्यात येत आहेत. तर काही रुग्णांना खासगी केंद्रातून ‘क्ष’ किरण काढण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून याबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे असलेल्या कूपर रुग्णालयामध्ये सांताक्रूझपासून वसई-विरारपर्यंतचे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णालयामध्ये दररोज किमान हजार रुग्ण दाखल होतात. विविध आजार व अपघात झाल्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ‘क्ष’ किरण काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या रुग्णालयामध्ये असलेली तीनही यंत्रे बंद आहेत. रुग्णांचे हाल होऊ नयेत ,यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून पोर्टेबल यंत्रांचा वापर केला जात आहे. मात्र या यंत्राद्वारे काही ठरावीकच ‘क्ष’ किरण काढले जात असल्यामुळे गंभीर आजारासंदर्भातील तपासणी करायची झाल्यास रुग्णाला जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये पाठविले जाते. अंधेरीतून क्ष किरण काढण्यासाठी जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात जाणे हे अनेक रुग्णांना शक्य होत नसल्याने नाईलाजास्तव खासगी केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करावी लागत आहे.

अतिरिक्त खर्चाचे ओझे

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणारे बहुतेक रुग्ण हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना खासगी केंद्रामध्ये जाऊन उपचार घेणे परवडत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर त्यामुळे अतिरिक्त खर्चाचे ओझे पडते. क्ष किरण काढण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक भूर्दंडामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय यामध्ये वेळही वाया जात असल्याने, ही यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.

क्ष किरण विभागातील तिन्ही यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती नादुरुस्त आहेत. नवीन यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी विभागामध्ये पोर्टेबल क्ष किरण यंत्रे ठेवण्यात आली आहेत. तसेच गरज भासल्यास रुग्णांना ट्रॉमा रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. – डॉ. छाया शिंदे, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय