मुंबई : डिजिटल युगात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कागदपत्रांच्या प्रतींसाठी प्रति पृष्ठ पाच रुपये शुल्क निश्चित करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. छायाप्रतीचा प्रत्यक्ष खर्च दीड ते दोन रुपयांच्या आसपास असताना प्रति पृष्ठ ५ रूपये आकारणे अवाजवी असून सदस्यांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणारे आहे, असा आक्षेप घेतला जात आहे. १७ सप्टेंबरला काढलेले हे परिपत्रक तातडीने मागे घेऊन प्रत्यक्ष खर्चाच्या आधारे शुल्क निश्चित करावे, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम १५४-ब-८नुसार सदस्यांना संस्थेच्या अभिलेखांची पाहणी तसेच त्यांच्या प्रती मिळवण्याचा अधिकार आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी १७ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उपविधींची प्रत, मागील वर्षांचा लेखापरीक्षित ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, समिती सदस्यांची यादी, सभासद नोंदवही तसेच सर्वसाधारण सभा आणि समिती बैठकींचे कार्यवृत्त आदी कागदपत्रांच्या प्रतींसाठी प्रति पृष्ठ ५ रूपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अॅड. धनंजय जुन्नरकर यांनी, परिपत्रकावर आक्षेप नोंदवत शुल्क मागे घेण्याची मागणी केली आहे. १०० पानांच्या कागदपत्रांसाठी सदस्याला ५००, ५०० पानांसाठी अडीच हजार, एक हजार पानांसाठी पाच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. प्रत्यक्ष छायाप्रतीचा खर्च कमी असताना एवढा दर आकारण्याचे कोणतेही स्पष्ट कारण परिपत्रकात दिलेले नाही, असा आक्षेप नोंदवत जुन्नरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना पत्र लिहून हे अवाजवी शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. संस्थेच्या कारभारातील आर्थिक व्यवहार, सभांचे कार्यवृत्त आणि इतर अभिलेखांची माहिती घेणे सदस्यांसाठी सुलभ असणे आवश्यक आहे. सदस्याला कायद्यानुसार कागदपत्रे पाहण्याचा अधिकार असताना त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागणे योग्य नसल्याचे जुन्नरकर यांचे म्हणणे आहे.
डिजिटल प्रती मोफत द्या
अनेक संस्थांकडे कागदपत्रे पीडीएफ किंवा अन्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे अशी कागदपत्रे सदस्यांना ई-मेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. नव्याने कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे आवश्यक असल्यास केवळ प्रत्यक्ष आणि सिद्ध होणारा खर्च आकारावा, असेही पत्रात म्हटले आहे.
मूळ परिपत्रकानुसार सदस्यांना अभिलेख पाहण्याचा आणि विहित शुल्क भरून त्यांच्या प्रती मिळवण्याचा अधिकार आहे. मात्र त्या प्रतींसाठी निश्चित केलेल्या ५ रूपये दरामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा दर प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत योग्य आहे का, हा प्रश्न आता सहकार विभागासमोर उपस्थित झाला आहे.
इतर मागण्या
- सहकारी गृहनिर्माण संस्था, सदस्य संघटना आणि संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करून सुधारित शुल्क निश्चित करावे.
- कृष्णधवल ए-४ छायाप्रतीसाठी प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल २ रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती आकारावी.
- मोठ्या संख्येने प्रती घेतल्यास बाजारातील दरानुसार शुल्क आणखी कमी करण्याची तरतूद करा.
- कायद्यानुसार कागदपत्रांची विनामूल्य पाहणी करताना सदस्याला स्वतःचा मोबाइल किंवा पोर्टेबल स्कॅनर वापरून कागदपत्रांच्या प्रती घेण्याचा अधिकार स्पष्ट करावा
- सात दिवसांत निर्णयाची माँगी
