मुंबई : सहकार क्षेत्राकडून प्रथमच उदंचन जलविद्युत प्रकल्पात (पंप स्टोरेज) मोठी गुंतवणूक करण्यात आली असून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेशी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात सामंजस्य करार केला. पंप स्टोरेजमध्ये शासनाचा हा १६ वा सामंजस्य करार असून संस्थेकडून एक हजार ८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पातून २४० मेगावॉट वीज उपलब्ध होईल.

महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून पुढील काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे आणि पंपस्टोरेजचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. यादृष्टीने राज्य शासनाने ६५ हजार मेगावॅट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत. अजून एक लाख मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे शासनाचे नियोजन आहे. पारेषण क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करुन २०३५ पर्यंत वीज पारेषण यंत्रणेचे कॉरिडॉर उभारावे लागणार आहेत. त्यादृष्टीने शासन पारेषणात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. त्यात पंप स्टोरेजची भूमि्का महत्वपूर्ण असणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पातून ३०० रोजगारनिर्मिती होणार असून वरच्या भागातील धरण कोदाळी (ता.चंदगड, जि.कोल्हापूर) येथे व खालच्या बाजूचे धरण केंद्रे (ता.दोडामार्ग,जि.सिंधुदुर्ग) येथे आहे. या सामंजस्य कराराच्या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विनय कोरे आदी उपस्थित होते.