मुंबई : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्पांना बदलत्या आर्थिक व तांत्रिक परिस्थितीनुसार चालना देण्यासाठी प्रकल्प अहवालाच्या सुधारित किमतीबाबत मंत्रालयात उच्चधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीत सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्प अहवालाची किंमत ८०.९० कोटी रुपयांवरून ११८ कोटी रुपये करण्याला मान्यता देण्यात आली आहे. वाढलेल्या बांधकाम खर्चासह आधुनिक यंत्रसामग्रीच्या किमती आणि उपलब्ध कोटेशनच्या आधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

मंत्रालयात वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार रणधीर सावरकर, वस्त्रोद्योग सचिव शैला ए., वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाने सुधारित प्रकल्प अहवाल २५,५३६ चात्यांच्या बांधकाम व यंत्रसामग्रीच्या कोटेशनच्या आधारे तयार करून वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्याकडे सादर केला होता. वस्त्रोद्योग आयुक्तालयाने या अहवालाची छाननी करून आवश्यक शिफारशींसह प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे. बैठकीत सुधारित प्रकल्प अहवालातील विविध बाबी, बांधकाम व यंत्रसामग्रीचा खर्च, प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तसेच प्रस्तावित वाढीव प्रकल्प किमतीच्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची सुधारित किंमत ११८ कोटी रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव पुढील शासकीय प्रक्रियेत असून, अंतिम निर्णयानंतर सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्पांच्या उभारणी, आधुनिकीकरणाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाच्या अंतिम निर्णयाकडे राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे लक्ष लागले आहे.

आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळेल

वाढलेले बांधकाम व यंत्र सामग्रीचे दर लक्षात घेता प्रकल्पाची किंमत ११८ कोटी रुपये करणे आवश्यक आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास सहकारी सूतगिरण्यांच्या आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी म्हटले आहे.