मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना आज जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. या अटकेत घेल्यानंतर तिघांनाही २५ दिवसांनी जामीन मिळालाय. या प्रकरणातील तीन मुख्य व्यक्तींना जामीन मिळाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासावर शंका घेणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया देताना हे संपूर्ण प्रकरणच फर्जीवाडा असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय.

माननीय उच्च न्यायालयाने क्रुज ड्रग्ज प्रकरणामध्ये आज तिघांना जमीन दिलाय, दोघांना कालच दिलाय. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये एनसीबीने युक्तीवाद केला तो पाहता हे प्रकरण खालच्या कोर्टामध्येच जामीन देण्यासारखं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, एनसीबीचे वकील रोज नवीन नवीन युक्तीवाद करत होते. लोकांना जास्त दिवस कसं तुरुंगात ठेवता येईल यासाठी ते युक्तावद करत राहिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पुढे बोलताना त्यांनी, “मी आज पुन्हा सांगतोय की हे सर्व प्रकरण फर्जीवाडा आहे.या सर्व पोरांना कुठेतरी वानखेडेंनी जाणूनबुजून अडकवलेलं आहे,” असं नवाब मलिक म्हणालेत.

आर्यन खान प्रकरण आणि क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये समीर वानखेडेंच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या नवाब मलिक यांनी आर्यनला जामीन मिळल्यानंतर ट्विटरवरुन फिल्मी स्टाइलमध्ये ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिलीय. पाचच्या सुमारास आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांनी ५ वाजून १४ मिनिटांनी, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं ट्विट केलं आहे.

वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे.

वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून रोज आरोप प्रत्यारोप होतानाचे चित्र दिसत आहे. त्यातच आज आर्यनला जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी केलेल्या ट्विटमधून यापुढेही ते वानखेडेंविरोधातील भूमिका काय ठेवणार असल्याचं स्पष्ट होतं आहे. आधीच त्यांनी आपण वानखेडेंसंदर्भातील बरीच कागदपत्रं वेळोवेळी पुढे आणणार असल्याचं म्हटलं आहे.