कॉर्डेलिया क्रूझने भारतात एकाचवेळी दोन बंदरांमधून क्रूझसेवा सुरू केली आहे. कॉर्डेलियाच्या ताफ्यात ‘स्काय’ ही दुसरी क्रूझ दाखल झाली असून गेल्या आठवड्यात मुंबईमधून ‘कॉर्डेलिया स्काय’ या क्रूझने तर कोचीमधून ‘कॉर्डेलिया एम्प्रेस’ या क्रूझनं ६ हजार पर्यटकांना समुद्राची सफर घडवली आहे.
आत्तापर्यंत एकाच क्रूझचा पर्याय असलेल्या कॉर्डेलियात दुसरी क्रूझ दाखल झाल्याने विविध मार्ग व जास्त पर्याय पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत. कंपनी यापुढेही विस्तार करण्याच्या प्रक्रियेत असून यातून येत्या काही वर्षांमध्ये २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे कॉर्डेलियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी युर्गन बेलम यांनी पत्रकारांना सांगितले. नव्याने दाखल झालेली ‘स्काय’ ही क्रूझ अत्याधुनिक असून १२०० पेक्षा जास्त खोल्या असलेल्या या क्रूझची प्रवासी क्षमता २,२८० इतकी आहे.
भारतीयांमध्ये पर्यटनाचा विचार करताना आता क्रूझ हाही एक पर्याय रुजत असल्याचे युर्गन म्हणाले. मुंबई हे निव्वळ आर्थिक राजधानीचं शहर नसून देशभरातूनच नव्हे तर जगभरातून या शहरात पर्यटक येत असतात. त्यामुळे मुंबई व कोची येथे येणाऱ्या पर्यटकांच्या निवडीमध्ये क्रूझचा समावेश वाढण्याची शक्यता असून एक वेगळाच अनुभव पर्यटकांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईमधून वीकेंड सेलिंगबरोबरच गोवा, लक्षद्वीप यासोबतच मालदीव्ज व श्रीलंका असे आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचे पर्यायही उपलब्ध होणार आहेत. पाच वर्षांपूर्वी २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझ समुद्रसफारीसाठी दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल ८ लाख पर्यटकांनी तिचा लाभ घेतला आहे. क्रूझ पर्यटनाची आवड दिवसेंदिवस वाढत असून नजीकच्या काळात पर्यटनाची ठिकाणं व पर्यायही वाढण्याची संधी असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत बॅलार्ड पिअर येथे २०२५ मध्ये मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनस उभारण्यात आले असून इथून वर्षाला १० लाख किंवा दर दिवशी सुमारे १० हजार इतक्या पर्यटकांची वाहतूक करण्याची सुविधा आहे. चार लाख चौरस फूट आकाराच्या या टर्मिनससाठी ५५६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. कॉर्डेलियाच्या ताफ्यात ‘एम्प्रेस’ व आता दाखल झालेल्या ‘स्काय’मागोमाग ‘सन’ या तिसऱ्या क्रूझचा समावेश पुढील वर्षी होणार आहे.

सध्या कॉर्डेलिया ही एकमेव भारतीय कंपनी क्रूझ उद्योगात असून येत्या काळात आणखी कंपन्या या क्षेत्रात उतरतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. क्रूझवर रेस्टॉरंट्स, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज, थिएटर, जिम तसेच मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने क्रूझ पर्यटकांमध्ये तरूण पिढीतील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे दिसत आहे.
