मुंबई : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मंगळवारी नव्या रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला. मुंबईत मंगळवारी २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३० पर्यंत पोहोचली. मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा शून्य मृत्युची नोंद झाली. मंगळवारी ७,३२० करोना चाचण्या करण्यात आल्या. तसेच १५८ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रुग्णवाढीचा दरही ०.०१७ टक्के असा वाढला आहे. असे असले तरी सध्या मुंबईत एकही चाळ किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.

राज्यात ३३८ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात मंगळवारीही दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्या वर कायम राहिली आहे. मंगळवारी राज्यात ३३८ रुग्ण नव्याने आढळले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे.राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून घरीच बरे होत आहेत. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी राज्यात ३३८ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून २७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी राज्यात शून्य मृत्यूची नोंद झाली.