scorecardresearch

करोना केंद्र कथित गैरव्यवहार : महापालिकेच्या सहआयुक्ताची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

करोना केंद्रातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नुकतीच चौकशी केली.

bmc Investigation by Economic Offenses Branch
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : करोना केंद्रातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नुकतीच चौकशी केली. याप्रकरणात माहिती घेण्यासाठी या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. या कथित गैरव्यवहाराच्या वेळी संबंधित अधिकारी मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होते. याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली.  याप्रकरणातील ते महत्त्वपूर्ण साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोग्य किंवा वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही पाटकर यांच्याशी संबंधीत लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (एलएचएमएस) या कंपनीला निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी का देण्यात आली ? कोणाच्या सांगण्यावरून या कंपनीला निविदा प्रक्रियेसाठी परवानगी देण्यात आली? याबाबत या अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यात आले. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर लवकरच याप्रकरणी इतर आरोपींना अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अधिकाऱ्याने चौकशीत संपूर्ण सहकार्य केले. तसेच त्यांनी याप्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई सुशोभिकरण प्रकल्प : खर्च मुंबई महानगरपालिकेचा, श्रेय राज्य सरकारचे

आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी नुकतीच राजीव ऊर्फ राजू नंदकुमार साळुंखे (४८) व सुनील ऊर्फ बाळा रामचंद्र कदम (५८) दोन आरोपींना अटक केली होती. साळुंखे एलएचएमएसचा भागिदार असून तपासात साळुंखे याच्या बँक खात्यातून कदम याच्या खात्यात ८२ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय एलएचएमएसच्या खात्यावरून ८७ लाख ३१ हजार व ४५ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्याबाबत कदमकडे चौकशी केली असता त्याने कंपनीसाठी केलेल्या कामाबाबत ८७ लाख ३१ हजार रुपये त्याला देण्यात आल्याचे सांगितले. पण त्याबाबत कोणतेही पुरावे कदमने सादर केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ४५ लाख रुपये कंपनीच्या कार्यालयाचे भाडे भरण्यासाठी मिळाल्याचे सांगितले. पण कदमकडून कार्यालयाच्या मालकाला कोणतीही रक्कम प्राप्त झाली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी जानेवारी महिन्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती. त्यांना करोना केंद्र प्रकरणात माहिती देण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >>> कोट्यवधींची फसवणूक प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणी सोमय्या यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कंपनीला वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कोणताही पूर्वअनुभव नसतानाही करोना केंद्राचे कंत्राट देण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या कंपनीची सेवा रद्द करून त्यांची अनामत रक्कम जप्त केली होती. त्यांना कोणतेही कंत्राट देऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या असतानाही या कंपनीने ही वस्तुस्थिती मुंबई महानगरपालिकेपासून लपवून ठेवली आणि करोना केंद्रांमध्ये सेवा देण्याचे कंत्राट मिळवले. त्यासाठी बनावट कागदपत्रे, भागिदारी कागदपत्रेही सादर केली. या संपूर्ण कंत्राटात झालेल्या गैरव्यवहारातून कंपनीने महापालिकेकडून ३८ कोटी मिळवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, तिचे भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या सर्वांवर फसवणूक विश्वासघात यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी सुजीत पाटकर हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विश्वासू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणचा तपास सध्या गुन्हे शाखा करीत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 09:51 IST
ताज्या बातम्या