मुंबई : राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्या संख्येतही काही अंशी वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात राज्यभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून ही संख्या जवळपास दुपट्टीहून जास्त वाढून १६ वर गेली. राज्यभरात जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढायला सुरूवात झाली आहे. ओमायक्रॉनच्या बीए.२ आणि बीए.२.३८ या उपप्रकारांचा प्रसार राज्यभरात जास्त असून त्याखालोखाल आता बीए.४ आणि बीए.५ यांचे रुग्णही आढळत आहेत. बीए.२ आणि त्याचे उपप्रकार यापासून होणारा संसर्ग सौम्य असल्याचे आढळले आहे.

बीए.४ आणि बीए.५ या उपप्रकारांचे आत्तापर्यत आढळलेल्या रुग्णांमध्येही करोनाची तीव्रता सौम्य असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे, त्या तुलनेत काही अंशी मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे आढळले आहे. ३० मे ते ५ जून या काळात राज्यभरात सात मृत्यूंची नोंद झाली होती. यामध्ये तीन मृत्यू मुंबईत, तर नाशिक, पुणे महानगरपालिका, सोलापूर आणि बीड येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यानंतर दोन आठवडय़ातच, १३ ते १९ जून या काळात मृतांच्या संख्येत जवळपास दुपटीहून जास्त वाढ होऊन १६ मृत्यू नोंदले गेले. या काळात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येतही जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्येचा आलेख दोन हजारांहून चार हजारांवर गेला. मुंबईतही हीच स्थिती असून दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारावरून दोन हजारांवर गेली. परिणामी मुंबईतील मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचे आढळले आहे. या काळात मुंबईत दहा (सुमारे ६० टक्के) मृत्यू नोंदले गेले. विशेष म्हणजे या काळात अन्य जिल्ह्यांमध्येही करोनाचा प्रसार वाढल्याने सुमारे ४० टक्के मृत्यू हे अन्य जिल्ह्यात झाले आहेत. या काळात रायगडमध्ये दोन तर ठाणे, वसई-विरार महानगरपालिका, जळगाव आणि सातारा येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या आठवडय़ातही रुग्णवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. २० ते २५ मे या सहा दिवसांत राज्यभरात १४ मृत्यू नोंदले असून यातील ११ मृत्यूची नोंद मुंबईत झाली आहे.

राज्यात ‘बीए. ४’ आणि ‘बीए. ५’ चे ४९ रुग्ण

मुंबई : मुंबईत बीए. ५ चे १७ आणि बीए. ४ चे सहा असे एकूण २३ नवे रुग्ण आढळल्याचे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या जनुकीय चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. राज्यातील बीए. ४ आणि बीए.५ या दोन्ही प्रकारच्या रुग्णाची संख्या ४९ झाली आहे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये ३६४ रुग्णांचे नमुन्यांची तपासणी केली असून यातील सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळले आहे. यातील ८९ टक्के रुग्णांमध्ये बीए. २ आणि बीए.२.३८ हे ओमायक्रॉनचे उपप्रकार असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांना १ ते १८ जून या काळात करोनाची बाधा झाली होती. यात ११ पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त ११ रुग्ण हे ५० वर्षांवरील तर, २६ ते ५० वयोगटातील नऊ, १९ ते २५ वयोगटातील २ आणि १८ पर्यंतच्या वयोगटातील एका रुग्णाचा समावेश आहे. मुंबईत बीए.४ आणि बीए.५ च्या रुग्णांची संख्या २८ झाली आहे. पुण्यात १५, नागपूर येथे चार आणि ठाण्यात दोन रुग्ण असे आता राज्यभरात या उपप्रकाराने बाधित रुग्णांची संख्या ४९ झाली आहे.

बहुसंख्य मृत्यू ६० वर्षांवरील

राज्यभरात करोनामुळे झालेल्या मृत्यूपैंकी बहुसंख्य रुग्ण हे ६० वर्षांवरील असून या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी दीर्घकालीन आजार असल्याचे आढळले आहे.

संकेतस्थळाच्या बिघाडामुळे नोंदीत अडचण

मुंबई : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील करोना रुग्णसंख्या अद्ययावत झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. आरोग्य विभागानेही त्याला दुजोरा दिला. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास पाच हजारांच्या घरात गेली आहे. परंतु शनिवारी राज्यातील रुग्णसंख्या दोन हजारांच्याही खाली आढळली. मुंबईत तर ८४० नव्या रुग्णांची नोंद झाली.

करोना चाचण्यांमध्ये बाधित झालेल्या रुग्णांची माहिती ‘आयसीएमआर’च्या संकेतस्थळावर अद्ययावत केली जाते. या संकेतस्थळामध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाल्याने ही माहिती अद्ययावत झाली नाही. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील बाधित रुग्णांची माहित न मिळाल्याने रुग्णसंख्याही कमी झाली आहे.

राज्यात चार जणांचा मृत्यू

राज्यभरात शनिवारी करोना संसर्ग झालेल्या चार जणांचा मृत्यू झाला. यातील तीन मृत्यू मुंबईत तर एक सोलापूरमध्ये नोंदवला आहे. राज्यभरात २ हजार ७०८ रुग्ण करोनामुक्त झाले.