सौर कृषीपंप योजनेस करोनाचा फटका

पहिल्या टप्प्यासाठी लाखभराहून अधिक अर्ज आले होते व २५ हजार पंप बसविले गेले

संग्रहित छायाचित्र

उमाकांत देशपांडे

शेतकऱ्यांना तीन वर्षांत एक लाख सौर कृषीपंप पुरविण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेस करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीचा आणि टाळेबंदीचा फटका बसला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या योजनेचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात २५ हजार, तर दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रित टप्प्यात ७५ हजार पंप बसविले जाणार होते. १० टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून, १० टक्के शासकीय अनुदान तर ८० टक्के रक्कम महावितरणकडे वीजशुल्काच्या ‘एस्क्रो’ खात्यातून वापरली जाणार होती.

पहिल्या टप्प्यासाठी लाखभराहून अधिक अर्ज आले होते व २५ हजार पंप बसविले गेले. पण नंतर लोकसभा- विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता काळात योजनेचा पुढील टप्पा सुरू झाला नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यास गती मिळण्याची अपेक्षा असताना करोना संकटामुळे  टाळेबंदीत प्रक्रियाही ठप्प झाली.

त्याचबरोबर राज्य सरकार व महावितरणपुढे आर्थिक चणचण असल्याने या योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकत नाही. पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांसाठी प्राधान्याने निधी मिळणे अपेक्षित असले तरी २०१९-२० या आर्थिक वर्षांतील निधी चालू आर्थिक वर्षांत तरतुदीच्या ३३ टक्क्य़ांपर्यंत वितरित करण्याचे अर्थ विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे ऊर्जा विभागाने राज्य सरकारच्या हिश्श्यातील केवळ २५ कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश काढले आहेत.

अत्यावश्यक कामांना प्राधान्य

सध्या महावितरणची यंत्रणा टाळेबंदीतून सावरत असून आर्थिक चणचणीमुळे अत्यावश्यक कामेच करण्यात येत आहेत. पावसाळ्यात या योजनेचे काम फारसे होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांकडून १० टक्के हिश्श्याची रक्कम सध्या मिळणे कठीण आहे. त्यामुळे ही योजना बरीच लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा व महावितरण कंपनीतील सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona hits solar agricultural pump scheme abn

ताज्या बातम्या