मुंबई : करोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यामुळे मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा करोनापूर्व काळातील चित्र दिसू लागले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असून डोंबिवली आणि बोरिवली या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे.
करोनामुळे लोकल प्रवासावर र्निबध आले आणि सुरुवातीला लोकल केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच सुरू होती. त्यानंतर सामान्य प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी देण्याची मागणी होऊ लागली. नियमावली तयार करून सामान्य प्रवाशांना ठरावीक मुदतीत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. तिसऱ्या लाटेपूर्वी दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्वच र्निबध हटविण्यात आले. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
करोनाकाळापूर्वी मध्य रेल्वेवरून दररोज ४२ ते ४५ लाख, तर पश्चिम रेल्वेवरून ३२ ते ३३ लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून दररोज सरासरी ३२ लाख २६ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. डोंबिवली स्थानकातून सर्वाधिक दोन लाख सात हजार ४९१ प्रवासी, तर ठाणे स्थानकातून एक लाख ८९ हजार ६४० प्रवासी प्रवास प्रवास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकातूनही दररोज सरासरी २५ ते २६ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. या उपनगरीय मार्गावरील बोरिवली स्थानकावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करीत असून या स्थानकातून दररोज दोन लाख १५ लाख २४९ प्रवासी प्रवास करतात. तर विरार स्थानकातून एक लाख ९८ हजार ४०३ प्रवासी प्रवास करीत आहेत, असे जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गर्दीची अन्य स्थानके
पश्चिम रेल्वे
• अंधेरी: एक लाख ७५ हजार ५२४
• नालासोपारा: एक लाख ५६ हजार ७२६
• भाईंदर: एक लाख ४१ हजार ८६३

मध्य रेल्वे
कल्याण: एक लाख ७१ हजार ३०९
• घाटकोपर: एक लाख ३६ हजार ३२८
• मुलुंड : एक लाख २४ हजार ०७८