करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्याच्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Uddhav
उद्धव ठाकरे

करोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याचा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. काल काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत याचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला.

सध्याच्या घडीला अनेक घरांमध्ये कुटुंबीय एकत्र आले आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

घरांमधले एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते तर आम्ही केव्हाच सुरु केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.

एवढंच नाही तर करोनाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जागतिक युद्धाशी केली. ते म्हणाले १९७१ चं युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू कुठून हल्ला करेल माहित नाही. त्यामुळे घरात राहिलं पाहिजे. आपण घराबाहेर गेलो तर शत्रू घरात येईल. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं.

तसंच ज्यांचं तळहातावर पोट आहे त्यांची काळजी सरकार घेणार आहे. सरकारच्या मदतीला आज अनेक हात येत आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद ठेवलं आहे त्या कंपन्यांना आम्ही विनंती केली आहे की माणुसकीचा विचार करुन त्यांचं किमान वेतन कापू नका अशीही विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, किराणा, भाजीपाला, वैद्यकीय सेवा बंद करणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हा महाराष्ट्र भगवा झालेला असतो. मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. हरकत नाही करोनाशी दोन हात करुन आपण ही लढाई जिंकू आणि त्यानंतर विजयाची गुढी उभारु ही लढाई आपण जिंकणारच आहोत असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona is the hidden enemy we have to fight with him says cm uddhav thackeray scj

ताज्या बातम्या