भविष्यातील गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम याबाबत गेले संपूर्ण वर्ष बेसावध राहिलेल्या शालेय शिक्षण विभागाला आता जाग आली आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत निर्माण झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वाभूमीवर आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या वर्षभरातील परीक्षाही गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत.

करोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. परीक्षा रद्द केल्या तरी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा पेच निर्माण झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आदल्यावर्षीचे गुण आणि दहावीच्या वर्षभरातील गुण याआधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारावीच्या मूल्यमापनाचा अंतिम निर्णय अजून प्रलंबित आहे. मात्र, वर्षभर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले नसल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे ज्या शाळांनी परीक्षा घेतल्या त्यातही समानता नव्हती. त्यामुळे अद्यापही मूल्यमापनाच्या सूत्राबाबत वादविवाद शमलेले नाहीत. या पाश्र्वाभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातही परिस्थिती सुरळीत झाली नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून अंतर्गत मूल्यमापन करून ठेवण्यासाठी नियोजन करण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे.

 

आता सारेच महत्त्वाचे…

नववी आणि अकरावीच्या परीक्षा विद्यार्थी विशेष गांभीर्याने घेत नाहीत. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावी वर्षातील शाळास्तरावरील परीक्षांचे गुण ग्राह््य धरण्यात येत नसल्यामुळे त्याबाबतही विद्यार्थी विशेष गंभीर नसतात असे निरीक्षण शिक्षकांनी सातत्याने नोंदवले आहे. त्यातच यंदाचे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा कधी भरणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. मात्र, आता वर्षभर शाळांनी घेतलेल्या ऑनलाईन किंवा लेखी परीक्षा विद्यार्थ्यांनी गांभिर्याने घेणे गरजेचे ठरणार आहे. वर्षाअखेरीस मंडळाची परीक्षा होऊ न शकल्यास विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील परीक्षांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

परीक्षा शाळा स्तरावरच…

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्याव्यात, कशा घ्याव्यात, किती गुणांच्या असाव्यात याबाबतची नियमावली शिक्षण विभाग निश्चित करणार आहे. मात्र प्रत्यक्षात शाळांनीच या परीक्षा घ्यायच्या आहेत. मूल्यांकनही शाळांनीच करायचे असून विभागाने दिलेल्या कालावधीत, तयार करण्यात येणाऱ्या प्रणालीवर गुण नोंदवायचे आहेत. वर्षाअखेरीस गुण नोंदवण्याऐवजी प्रत्येक परीक्षेनंतर ठराविक कालावधीत शाळांना गुण नोंदवावे लागणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.