खासगी रुग्णालयांकडून होणारी करोना रुग्णांची लूटमार रोखणार- मुख्य सचिव अजोय मेहता

पाच आयएएस नियुक्त, मेलवर तक्रारीची सुविधा, रुग्णालयात पालिका अधिकारी असणार

संदीप आचार्य 
मुंबईत करोना रुग्णांनाच नव्हे तर सामान्य रुग्णांनाही खासगी रुग्णालयात खाट मिळावी यासाठी वणवण करावी लागते. हे कमी म्हणून की काय खाट मिळालीच तर अवाच्या सव्वा बिल आकारली जातात याची गंभीर दखल घेत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रुग्णाच्या लुबाडणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र मेल आयडी जाहीर करण्यास मुंबई पालिकेला सांगितले. तसेच पाच आयएएस अधिकाऱ्यांना नियमितपणे मोठ्या खासगी रुग्णालयांना भेट देण्यास व या सर्व रुग्णालयात पालिकेच्या लेखा विभागाचे एकेक अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे.

मुंबईतील लीलावती, बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, हिंदुजा, नानावटी, सोमय्या आदी बड्या पंचतारांकित रुग्णालयात व ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून भरमसाठ बिलं करोना काळात आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. गंभीर म्हणजे सरकारने ३० एप्रिल रोजी एपिडेमिक अॅक्ट १८९७ अन्वये व अन्य कायद्यांचा वापर करून रुग्णालयांनी किती दर कोणत्या आजारासाठी वा शस्त्रक्रियेसाठी घ्यावा हे निश्चित केले होते. याच्या अमलबजावणीची जबाबदारी महापालिका क्षेत्रात महापालिकांची तर अन्यत्र आरोग्य विभागाची असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी माध्यामातूनही याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होऊनही अजिबात दखल घेतली नाही की कारवाई केली. एवढेच नाही तर २१ मे रोजी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा सुस्पष्ट आदेश सरकारने काढल्यानंतर गेल्या १४ दिवसात आयुक्त चहेल यांनी बड्या रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे टाळण्याचा आरोप करत भाजपाने आज थेट आयुक्ताच्या दालनाबाहेर आंदोलन केले.

८० टक्के खाटा कधी ताब्यात घेणार हे आंदोलनकर्त्या भाजपाला आयुक्त सांगू शकले नाहीत. महापालिका रुग्णालयात अतिदक्षता विभागात पुरेशा खाटा नाहीत, रुग्णवाहिकांची बोंब आहे मात्र खाजगी रुग्णालयात रुग्णांची लुटमार होत असताना आयुक्त चहेल कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत तसेच ८० टक्के खाटा ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता यांना विचारले असता मुंबई महापालिकेतील पाच आयएएस अधिकाऱ्यांना मोठ्या खासगी रुग्णालयात रोज भेट देण्यास सांगितले जाईल तसेच रुग्णांच्या लूटमार वा अन्य तक्रारी दाखल करून तात्काळ कारवाईसाठी स्वतंत्र मेल जाहीर केला जाईल. या मेल आयडीवर रुग्णांना तक्रारी दाखल करता येतील तसेच या प्रमुख मोठ्या रुग्णालयात पालिकेच्या लेखा विभागातील एक अधिकारी यापुढे खासगी रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करेल असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले. याची तात्काळ अमलबजावणी करण्यास आपण पालिका आयुक्त चहेल यांना सांगितल्याचे मुख्य सचिव म्हणाले.

३० एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ज्या रुग्णालयांनी बिल आकारले नसेल त्यांचीही तपासणी केली जाऊन अतिरिक्त बिल आकारणी झाली असेल तर संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल असे अजोय मेहता यांनी सांगितले. ज्या रुग्णांना रुग्णालयांनी आपली बिलात फसवणूक केली व जादा बिल घेतले असे वाटत असले त्यांनी महापालिकेच्या मेल वर आपली तक्रार दाखल करावी असेही मुख्य सचिव म्हणाले. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा लवकरात लवकर ताब्यात घेण्याबाबत आपण आयुक्तांशी बोलू असेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona patients from private hospitals heavy bills must be stop says chief secretary ajoy mehta scj

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या