scorecardresearch

अन्य आजारांच्या सेवा पूर्ववत

मुंबईत करोनाची तिसरी लाट ओसरत असल्यामुळे आता मागील महिनाभरापासून स्थगित केलेले करोनाव्यतिरिक्त आजारांचे उपचार पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत.

करोनालाटेत पुढे ढकललेल्या शस्त्रक्रियांसह सर्व सेवा पुन्हा सुरू

मुंबई : मुंबईत करोनाची तिसरी लाट ओसरत असल्यामुळे आता मागील महिनाभरापासून स्थगित केलेले करोनाव्यतिरिक्त आजारांचे उपचार पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. यात प्रामुख्याने पुढे ढकलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. मुंबईत लाट शिखरावर असताना दैनंदिन रुग्णसंख्येने जवळपास २० हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे करोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार काही रुग्णालयांनी स्थगित केले. यामध्ये बाह्यरुग्ण विभाग आणि आपत्कालीन सेवा सुरू होत्या. परंतु शस्त्रक्रिया, रुग्ण दाखल करून घेण्याचे प्रमाण अगदी कमी झाले होते. संसर्ग झपाटय़ाने पसरत असल्यामुळे डॉक्टर, पारिचारिकांसह आरोग्य कर्मचारीही अधिकाधिक बाधित होते. मनुष्यबळ कमी झाल्यामुळे अन्य आजारांच्या उपचार सेवेवरही याचा परिणाम झाला होता. या काळात रुग्णालयात अन्य उपचारांसाठी आलेल्या रुग्णांनाही करोनाची बाधा झाल्याचे मोठय़ा प्रमाणात आढळत होते. त्यामुळे ही अन्य आजारांच्या सेवा देणे या काळात शक्य झाले नाही.

गेल्या आठवडाभरात संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात वेगाने कमी होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालीच आहे. याव्यतिरिक्त बाधितांचे प्रमाणही तीन टक्क्यांपर्यत घसरले आहे. तसेच रुग्ण वेगाने बरे होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ही दहा हजारापर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आता करोनाव्यतिरिक्त आजारांच्या सेवा पुन्हा सुरू करण्यास रुग्णालयांनी सुरुवात केली आहे. नायर रुग्णालयामध्ये आता आम्ही अगदी मोजक्याच खाटा करोना रुग्णांसाठी ठेवत आहोत. बाकी सर्व खाटा करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी खुल्या केल्या आहेत. करोनाबाधितांची संख्या कमी असून यासाठी जम्बो रुग्णालये उपलब्ध असल्यामुळे सर्व सेवा अन्य आजारांच्या रुग्णांसाठी उपलब्ध केल्या जात आहेत. तसेच शस्त्रक्रियाही हळूहळू पूर्ववत होत असून सर्व शस्त्रक्रिया विभाग खुले केले आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली उपनगरीय रुग्णालयांमध्ये आता काही खाटावगळता सर्व खाटा करोना व्यतिरिक्त आजारांसाठी खुल्या केलेल्या आहेत. करोना काळात अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे या प्रलंबित आहेत. या शस्त्रक्रियाही पुन्हा सुरू केलेल्या आहेत. आरोग्य कर्मचारीही बाधित होऊन पुन्हा रुजू झाल्यामुळे आता मनुष्यबळाचीही तुटवडा नाही. त्यामुळे आता करोनाव्यतिरिक्त आजारांच्या सेवा पूर्णपणे सुरू झालेल्या आहेत, असे उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

इतर आजारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या करोना चाचण्या केल्या जातात. त्यामुळे निदान होण्याच्या भीतीने मागील महिनाभरात दाखल रुग्णांची संख्याही कमी होती. करोनाच्या या संसर्गाचे स्वरूप सौम्य असल्याचे सर्वानाच ज्ञात झाल्यामुळे रुग्णांमधील ही भीतीही कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही पूर्वीइतकीच होत आहे, असे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. करोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या सेवांवर विशेष लक्ष दिले जाईल तर करोनाच्या रुग्णांची पूर्ण जबाबदारी ही जम्बो रुग्णालयांवर दिली जाईल, अशा सूचनाही रुग्णालयांना दिलेल्या आहेत, असे पालिकेच्या मुख्य रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona services other ailments surgery services ysh

ताज्या बातम्या