scorecardresearch

मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात; पालिकेचा उच्च न्यायालयात दावा

करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत करोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पालिकेचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई : मुंबईत ६ ते ९ जानेवारीपर्यंत ओमायक्रॉनमुळे करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. ९ जानेवारीला करोना रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, त्यानंतर रुग्णआलेख घसरला असून, मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आहे, असे पालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले.

करोना व्यवस्थापनाशी संबंधित याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली़  मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात असल्याचे पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. अनिल साखरे यांनी सुनावणीवेळी सांगितले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत करोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला. परंतु, आता त्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची दैनंदिन संख्या दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे, याकडे अ‍ॅड़् साखरे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. उपचाराधीन रुग्ण, उपलब्ध खाटा, प्राणवायूची उपलब्धता, प्राणवायूची आवश्यकता असलेल्या व अतिदक्षता विभागात दाखल करोना रुग्णांची संख्या तसेच लसीकरणाचा तपशीलही साखरे यांनी यावेळी न्यायालयात सादर केला. 

मुंबईत प्राणवायूचा पुरेसा साठा असून, खाटाही उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरण्याची स्थिती नसल्याचेही साखरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, मुंबईतील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पालिकेला म्हणायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावेळी मुंबईतील करोनास्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.

पालिकेच्या या माहितीनंतर न्यायालयाने राज्यातीलही करोनाच्या स्थितीबाबत पुढील सुनावणीच्या माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

केरळमध्ये बाधितांचे प्रमाण  ३७ टक्क्यांवर

तिरूवनंतपूरम : केरळमध्ये करोना रुग्णवाढ झपाट्याने होत असून, बुधवारी ३४,१९९ रुग्ण आढळले़  चाचण्यांच्या तुलनेत राज्यातील बाधितांचे प्रमाण ३७़ १७ टक्क्यांवर पोहोचले आहे़  तिरूवनंतपुरममध्ये तर हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४५़ ८ टक्के आहे़

रुग्णआलेख स्थिर

मुंबई : मुंबईत करोना रुग्णवाढीचा आलेख स्थिर आहे़ शहरात बुधवारी ६ हजार ३२ नवे रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या पाच ते सात हजारांदरम्यान स्थिरावली आहे. शहरात बुधवारी आढळलेल्या ६ हजार ३२ रुग्णांपैकी ५३८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर १०३ रुग्णांना प्राणवायूची गरज भासली़ करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट असून, बुधवारी शहरात १८ हजार २४१ रुग्ण करोनामुक्त झाले.

राज्यात ४३,६९७ नवे रुग्ण मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात करोनाच्या ४३,६९७ रुग्णांची नोंद झाली़  गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४६,५९१ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,७०८ इतकी आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona situation in mumbai under control municipal corporation claim in the high court akp

ताज्या बातम्या