scorecardresearch

खासगी रुग्णालयांचा आडमुठेपणा;मुदत संपण्यास अल्पकाळ असताना लसमात्रा मोफत देण्यास नकार

लसकरण मोहिमेच्या विकेंद्रीकरणाच्या नावाखाली खासगी रुग्णालयाच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्राच्या लस धोरणाचे परिमाण अजूनही प्रकर्षांने दिसून येत आहेत

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: मुंबईसह राज्यभरात मुदतबाह्य होणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीचा साठा मुंबईतील केवळ दोन रुग्णालये वगळता अन्य कोणत्याही खासगी आरोग्य कंपन्या किंवा रुग्णालयांनी  सरकारी केंद्रावर मोफत वापरण्यास उपलब्ध केलेला नाही, त्यामुळे यातील बहुतांश साठा गेल्या आठवडय़ात मुदतबाह्य होऊन गेला आहे, तर काही रुग्णालयांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये मुदतबाह्य होणार आहे.

लसकरण मोहिमेच्या विकेंद्रीकरणाच्या नावाखाली खासगी रुग्णालयाच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्राच्या लस धोरणाचे परिमाण अजूनही प्रकर्षांने दिसून येत आहेत. नफ्याच्या उद्देशाने खासगी रुग्णालयांनी लशींची साठेबाजी केली. परंतु खासगी रुग्णालयातील लसीकरणाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात लशींच्या सुमारे ८० हजार  मात्रा मुदतबाह्य होणार आहेत. यातील काहींची मुदत गेल्या आठवडय़ात संपली आहे.  मुदतबाह्य होणारा लशीचा साठा सरकारी केंद्रातील लशींच्या साठय़ासोबत बदलून देण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना देत खासगी रुग्णालयांना पाठीशी घातले. राज्याच्या आरोग्य विभागाने लस साठा बदलून देण्यास नकार दिला.  मोफत उपलब्ध करून दिल्यास सरकारी केंद्रावर वापरला जाईल. मुदतबाह्य होणाऱ्या लशींची माहिती देण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले होते. परंतु मुंबई वगळता अन्य कोणत्याही जिल्ह्यातील रुग्णालयांनी हा साठा मोफत वापरण्यास उपलब्ध  करून देण्याऐवजी वाया घालवला. मुदतबाह्य होणाऱ्या साठय़ाची माहिती देखील दिलेली नाही असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  मुंबईत ५० हजाराहून अधिक मात्रांचा साठा मुदतबाह्य झाला आहे. परंतु यातील केवळ बॉम्बे रुग्णालय आणि सुराणा रुग्णालय यांनी त्यांच्या काही लशी पालिकेच्या केंद्राकडे दिल्या. अन्य रुग्णालयांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

एकीकडे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे परदेशात लशींची मागणी वाढत आहे. आपल्याकडे केवळ केंद्र सरकारचे चुकीचे लस धोरण आणि खासगी रुग्णालयांचा आडमुठेपणामुळे हा साठा वाया जाणे चुकीचे आहे. यात  देशाचे नुकसान आहे.  केंद्र आणि खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेत आर्थिक नुकसान न पाहता या लशींचा वेळेत वापर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. 

यांच्यात समन्वय नसल्यामुळे हे घडले. भविष्यात या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घायला हवी, असे मत सार्वजनिक आरोग्य विषयातले तज्ज्ञ डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.

काय झाले ?

मुंबईतील खासगी रुग्णालयांनी मुदतबाह्य होणारा लस साठा बदलून देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु राज्य सरकारच्या सूचनेनुसार पालिकेने लससाठा बदलून देण्यास नकार दिला आणि मोफत साठा उपलब्ध केल्यास वापरण्याची हमी दिली. रुग्णालयांनी साठा मुदतबाह्य होऊन वाया गेला तरी चालेल परंतु बदलून देत नसल्यामुळे सरकारी रुग्णालयांनाही मोफत द्यायचा नाही अशी आडेबाजीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यातील बराचसा साठा वेळेत वापर न झाल्याने मुदतबाह्य झाला आहे, तर काही साठा पुढील आठवडय़ात मुदतबाह्य होणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona stubbornness private hospitals refuse vaccine free amy