भारतात करोनाची दुसरी लाट सुरू झाली असून काही राज्यांमध्ये याचं भीषण रूप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून त्यातही मुंबई रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये दिसलं होतं. यासोबतच मुंबईत मृतांचा आकडा एक अंकीवरून दोन महिन्यात पुन्हा दोन अंकी होऊन आता तीन अंकी होतोय की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. मुंबईतल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीबाहेर अंत्यविधींसाठी लागलेल्या रांगा करोनाचं हेच विदारक वास्तव स्पष्ट करत आहेत. मुंबईतल्या दफनभूमीमध्ये कर्मचारी २४ तास काम करत असूनही त्यांना उसंत मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर येऊ लागलं आहे.

वर्षभरात सुट्टीच घेतली नाही!

मुंबईतल्या दफनभूमीत काम करणारे सय्यद मुनीर कामरूद्दीन यांनी राऊटर्सशी बोलताना आपला दिनक्रम सांगितला. त्यातून मुंबईत करोनानं किती गंभीर रुप धारण केलं आहे याची प्रचिती यावी. “मी आणि माझे सहकारी गेल्या काही दिवासांपासून करोनामुळे झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचं दफन करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहोत. हेच आमचं एकमेव काम आहे. मृतदेह घ्यायचे, रुग्णवाहिकेतून बाहेर काढायचे आणि त्यासाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पुरायचे”, असं कमरुद्दीन सांगतात. गेल्या वर्षभरात आपण सुट्टीवरच गेलो नसल्याचं सांगताना कमरूद्दीन यांच्या डोळ्यात आप्तस्वकीयांना भेटण्याची आस दिसून जाते!

२५ वर्षांपासून खड्डे खणण्याचं काम!

करोनाच्या रुग्णांचे मृतदेह पुरताना कमरूद्दीन यांच्या करोनाबद्दलच्या भावनाच मेल्यात जणू. ते सांगतात, “आता मला करोनाची भिती वाटतच नाही. मी धीराने या सगळ्या गोष्टींना सामोरा गेलो. आता भिती नाही, धैर्य आलंय”. ५२ वर्षांचे कमरुद्दीन गेल्या काही दिवसांमध्ये दिवसाचे २४ तास करोनाच्याच रुग्णांच्या मृतदेहांच्या संपर्कात आहेत. गेल्या २५ वर्षांपासून मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खणून त्या मृतदेहांचं दफन करण्याचं काम करमरुद्दीन करत आहेत.

उपवास करणंही अशक्य!

रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लीम बांधव उपवास करतात. पण कमरुद्दीन यांना तेही शक्य होत नाही. “माझं काम फार कठीण आहे. मला खूप तहान लागते. पण मला खड्डे खणावे लागतात. ते माती टाकून झाकावे लागतात. मृतदेह उचलावे लागतात. हे सगळं करताना मी उपवास कसा करू शकतो?” असा सध्या काहीच उत्तर नसलेला प्रश्न ते विचारतात आणि समोरच्यालाच निरुत्तर करतात!

लसींच्या किंमतीबाबत सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबईतली चिंताजनक आकडेवारी!

राजधानी मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात करोनाचे ४ हजार ९६६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ६ लाख ४० हजार ५०७ इतका झाला असून त्यापैकी ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्णांवर मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड केंद्रांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत ७८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता १२ हजार ९९० इतका झाला आहे.