करोना लशीचे गंभीर दुष्परिणाम नाहीत ; केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा फेरविचार आवश्यक

लस घेतल्यानंतरही करोनाची बाधा झाली तरी आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते

प्रतिनिधिक छायाचित्र

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: औषधे, खाद्यपदार्थ यातील काही घटकांचे वावडे असलेल्या (अ‍ॅलर्जी) व्यक्तींनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली तरी याचे गंभीर दुष्परिणाम आढळले नसल्याचे मुंबई अ‍ॅलर्जी सेंटरने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना करोना लस न देण्याच्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा फेरविचार होणे आवश्यक आहे, असे या अभ्यासातून अधोरेखित केले आहे.

 मुंबईतील २२७ रुग्णांचा अभ्यास केलेला असून नुकताच ‘जर्नल ऑफ द असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ या वैद्यकीय नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे.

 लस घेतल्यानंतरही करोनाची बाधा झाली तरी आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते. केंद्राने आपत्कालीन वापरासाठी या लशींना परवानगी देताना खाद्यपदार्थ, औषधे किंवा विविध प्रकारच्या लशींतील काही घटक शरीराला चालत नसलेल्या व्यक्तींवर लशीचे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने लस देऊ नये असे सूचित केले. परिणामी अशा व्यक्तींना लसीकरणातून वगळण्यात आले असून यांना करोनाची बाधा होण्याचा धोका अधिक आहे.

या अभ्यासानुसार अशा रुग्णांनी  ८१ रुग्णांनी लशीची पहिली तर ३३ जणांनी लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या. यातील एकाही रुग्णाला गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत. सुमारे ८५ टक्के रुग्णांनी कोविशिल्ड, १० टक्के रुग्णांना कोव्हॅक्सिन आणि प्रत्येकी एका रुग्णाने मॉडर्ना आणि स्फुटनिक लस घेतली.

आमच्या जवळच्या डॉक्टरांना अ‍ॅलर्जी असल्यामुळे त्यांनी लस घेतली नाही. परंतु त्यांच्या पत्नीने घेतली. त्यानंतर काहीच दिवसांत या जोडप्याला करोनाची बाधा झाली. यातून त्यांची पत्नी बरी झाली परंतु डॉक्टरांचा मात्र मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध घटकांचे वावडे असलेले अनेकजण लसीकरणापासून वंचित असल्यामुळे या व्यक्तींचे लसीकरण कशारितीने सुरक्षितरित्या करता येऊ शकते यासाठी मुंबई अ‍ॅलर्जी सेंटरने हे संशोधन हाती घेतल्याचे सेंटरच्या संचालक आणि केईएम रुग्णालयातील मानद अ‍ॅलर्जीतज्ज्ञ डॉ. सुनीता शुक्ला यांनी सांगितले.

.. तर लस का देऊ नये?

लस तयार करताना विषाणूच्या अंशासह लस अधिक काळ टिकावी यासाठी संरक्षक म्हणून आणखी काही घटकांचा वापर केलेला असतो. याच घटकांचा वापर औषधे, काही खाद्यपदार्थामध्येही केलेला असतो.  त्यामुळे सरसकट सर्व प्रकारच्या घटकांचे वावडे असलेल्या व्यक्तीला लशीचा धोका आहे असे नव्हे, असे डॉ. शुक्ला यांनी स्पष्ट केले.

या रुग्णांनी घेतली लस

अभ्यासामध्ये सुमारे ४० टक्के रुग्णांना खाद्यपदार्थाची, सुमारे १० टक्के रुग्णांना औषधांतील घटकांचे वावडे होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona vaccine does not have serious side effects zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या