बेस्ट, एसटीवरील ताण वाढला

करोनाविषयक निर्बंध शिथिल झाल्याने विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या काहीशी वाढली आहे.

निर्बंध शिथिल झाल्याने प्रवासीसंख्येत वाढ; लोकल प्रवाशांच्या संख्येत अल्प भर

मुंबई : करोनाविषयक निर्बंध शिथिल झाल्याने विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या काहीशी वाढली आहे. परिणामी बेस्ट, एसटीवरही ताण येत असून प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना अटीसापेक्ष लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर रेल्वे स्थानकावरून घर गाठण्यासाठी बस, एसटीचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, दोन लसमात्रा घेतलेल्यांकडून मासिक पास घेण्यात मोठी वाढच होत असली, तरीही लोकल प्रवासी संख्येत मात्र किं चितच वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक निर्बंध लागू होते. त्यात सरकारी, खासगी कार्यालयांच्या उपस्थितीवरही बंधने होती. तर दुकाने, हॉटेल इत्यादी सेवांसाठीही नियमावली लागू के ली होती. परंतु हे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि कार्यालयांच्या उपस्थितीबरोबरच अनेक र्निबधांतून सूट देण्यात आली. बेस्ट, एसटीतून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ५० टक्क्यांवरून १०० टक्के  करण्यात आली. फक्त उभ्याने प्रवास करण्यावरील बंधन कायम ठेवण्यात आले, तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच असलेली लोकल १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी अटीसापेक्ष खुली करण्यात आली. एकं दरीतच यातून सवलत मिळाल्यावर कार्यालयांतील उपस्थितीत, तसेच विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेस्ट, एसटी सेवांवर ताण पडत असून प्रवासी संख्येत हळूहळू काहीशी वाढ होत आहे.

ठाणे, कल्याण, वसई, विरार येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या एसटीतून १२ ऑगस्ट २०२१ ला ४४ हजार ८५६ प्रवाशांनी प्रवास के ला होता. या दिवशी २१२ एसटी धावल्या होत्या. १६ ऑगस्टला ही संख्या ४४ हजार ९०९ होती. तर आता ४८ हजार ८७८ प्रवासी मुंबई महानगरात एसटीने प्रवास करू लागले असून त्यासाठी २२४ बसगाडय़ा चालवण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. १३ ऑगस्टला २४ लाख २६ हजार ६५, तर १६ ऑगस्टला २२ लाख ७७ हजार प्रवाशांनी बेस्ट उपक्र माच्या गाडय़ांमधून प्रवास के ला. १७ ऑगस्टला हीच संख्या २४ लाख ४१ हजार ९० एवढी झाली. १५ ऑगस्टपासून सामान्यांचाही लोकल प्रवास सुरू झाला. त्यामुळे स्थानकाबाहेर उपलब्ध होणाऱ्या बेस्ट बस, एसटी बसमधून प्रवासी इच्छितस्थळी जात आहेत. निर्बंध शिथिल के ल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये प्रवासीसंख्येत आणखी वाढ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल प्रवासी संख्येत धीम्या गतीने वाढ

दुसरी लसमात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु रविवार आणि सोमवारी सलग सुट्टय़ांमुळे  प्रवासी संख्या कमीच होती, तर मंगळवारीही प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तुरळकच वाढ होती. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर १२ ऑगस्टला १७ लाख ६१ हजार प्रवासी संख्या होती. १७ ऑगस्टला ही संख्या १८ लाख १५ हजार ७९४ झाल्याची माहिती दिली. पश्चिम रेल्वेवरही १३ ऑगस्टला १२ लाख ३९ हजार ५०२ असलेली प्रवासी संख्या १७ ऑगस्टला १४ लाख ४२ हजार ८४८ झाली. महत्त्वाची बाब म्हणजे १६ ऑगस्टला हीच संख्या १५ लाख ७७ हजार १०५ होती. त्यामुळे दोन लसमात्रा घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही अद्याप स्थिरता नसल्याचे दिसते.

मासिक पासच्या संख्येत वाढच

दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले नागरिक लोकलचा मासिक पास घेत आहेत. मध्य रेल्वेवर ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत १ लाख ४३ हजार ४६१ मासिक पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवरही ६५ हजार ९२९ पास विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus best st travel ssh