मार्चनंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणात चाचण्या; निर्बंध शिथिल झाल्याने पालिकेची खबरदारी

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरात प्रतिदिन ५० हजारांहून अधिक करोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. मार्च २०२१ नंतर प्रथमच प्रतिदिन इतक्या चाचण्या मुंबईत होत आहेत.

निर्बंध शिथिल केल्यामुळे संसर्ग प्रसाराचा आणि आगामी तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी पालिकेने गेल्या दोन दिवसांपासून चाचण्यांची संख्या सुमारे ३५ हजारांवरून थेट ५० हजारांहूनही अधिक वाढवली आहे.

पालिकेने १८ आणि १९ ऑगस्ट रोजी अनुक्रमे ५२,४८२ आणि ५६,५६६ चाचण्या केल्या आहेत. मुंबईतील चाचण्याची संख्या वाढली तरी प्रतिदिन नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र ३०० च्या खालीच आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही १ टक्क्याखाली राहिले आहे.

दुसरी लाट वेगाने वाढत होती, त्या वेळी मुंबईत प्रतिदिन २५ हजार चाचण्या केल्या जात होत्या. रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत होती, तरी चाचण्यांची संख्या वाढत नसल्याची टीका पालिकेवर होत होती. तेव्हा पालिकेने ५० हजारापर्यंत चाचण्या करण्याचे जाहीर करत चाचण्यांची संख्या दुपटीने वाढविली. परंतु काहीच दिवसांत चाचण्यांचा आलेख पुन्हा ३० हजारच्या खाली गेला. मार्चनंतर आतापर्यंत प्रतिदिन चाचण्यांची संख्या कधीच ४० हजारांपर्यंत गेली नाही.

रुग्णसंख्येत घट होण्याचे कारण

मुंबईत १६ आणि १७ ऑगस्टला नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २०० हूनही कमी झाल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी ३५ हजार चाचण्या केल्या गेल्या. परंतु १६ आणि १७ ऑगस्टला अनुक्रमे २६,४८४ आणि २८,५०८ चाचण्या केल्या गेल्या. चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

प्रतिबंधित गृहसंकुलांच्या संख्येत किंचित वाढ

१५ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, शहरात २१ इमारती प्रतिबंधित होत्या. पाच दिवसांत ही संख्या २६ वर गेली आहे. मुंबईतील झोपडपट्टय़ा मात्र करोनामुक्त असून एकही चाळ किंवा झोपडपट्टी गेल्या आठ दिवसांपासून प्रतिबंधित नाही.

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधातही घट

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने एका बाधित व्यक्तीमागे संपर्कातील २० जणांचा शोध घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर संपर्कातील व्यक्तींच्या शोधाचे प्रमाण पाचवरून १० पर्यंत वाढले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे प्रमाण पुन्हा कमी झाले आहे. सध्या १० पेक्षाही कमी व्यक्तींचा शोध घेतल्याचे दिसून येते.

२०० रुग्णांची जनुकीय चाचणी अहवाल सोमवारी अपेक्षित

मुंबई : करोना विषाणूंच्या जनुकीय रचनांमधील बदल शोधण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जनुकीय प्रयोगशाळा नुकतीच सुरू झालेली असली तरी रुग्णसंख्या घटल्यामुळे या यंत्रणेचा अद्याप वापर करण्यास सुरुवात झाली नव्हती. मात्र आता २०० रुग्णांच्या नमुन्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली असून त्याचे अहवाल येत्या सोमवारी अपेक्षित आहेत.

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र बसवण्यात आले असून प्रयोगशाळा नुकतीच सुरू करण्यात आली. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळेचा मोठा फायदा होणार असून करोना विषाणूचा नवा प्रकार आला असल्यास त्याची ओळख लवकर पटू शकेल. मात्र सध्या मुंबईतील रुग्णसंख्या व मृत्यूची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे जनुकीय चाचण्यांसाठी पुरेसे नमुने नसल्यामुळे अद्याप ही प्रयोगशाळा सुरू झाली नव्हती. या प्रयोगशाळेत एका वेळी ३८४ नमुन्यांची तपासणी करता येणार असून चार दिवसांत चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

जनुकीय चाचण्या कुणाच्या?

  • चार प्रकारांतील रुग्णांच्या जनुकीय चाचण्या के ल्या जाणार आहेत. एखादा रुग्ण खूप दिवस रुग्णालयात दाखल असेल तर त्याची जनुकीय चाचणी केली जाणार आहे.
  • परदेशातून आलेल्या एखाद्या प्रवाशाला करोना झाला तर त्याचीही जनुकीय चाचणी केली जाईल.
  • एखाद्या इमारतीत किंवा वसाहतीत एकाच वेळी अनेक रुग्ण आढळून आले तर अशा ठिकाणचे नमुनेही जनुकीय प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.
  • एखादा रुग्ण करोनामुळे दगावला तर त्याच्या नमुन्यांचीही चाचणी केली जाईल.
  • चाचणी करताना करोना विषाणूचा नवा प्रकार आहे का, त्यात काही जनुकीय बदल झाले आहेत का हे तपासले जाणार आहे.

पुरेसे नमुने गोळा केल्यानंतर चाचणी

जनुकीय चाचणीसाठी पालिके कडे सहा हजार किट आहेत. मात्र थोडय़ा संख्येने नमुने गोळा के लेले असताना चाचण्या के ल्यास त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे पुरेसे नमुने गोळा के ल्यानंतर ही चाचणी करण्यास सुरुवात के ली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे सुरू झाल्यामुळे स्थानकावर काही प्रमाणात चाचण्या वाढलेल्या आहेत. चाचण्या वाढल्या तरी बाधितांची संख्या किंवा प्रमाण वाढल्याचे दिसत नाही. त्यामुळे अजून तरी संसर्गाचे प्रमाण कमी आहे.

– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका