scorecardresearch

उत्पन्न उद्दिष्टापासून उपनगरीय रेल्वे दूरच; करोनामुळे प्रवासी कमी

 करोनाआधी दोन्ही उपनगरीय रेल्वेमधून सुमारे १,६०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होते.

local-train
संग्रहीत छायाचित्र

मुंबई: करोना संसर्ग आणि प्रवास निर्बंधामुळे मध्य तसेच पश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवासी तिकीटातील उत्पन्न उद्दिष्टापासून मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे यंदाही दूरच राहिले आहे.

 करोनाआधी दोन्ही उपनगरीय रेल्वेमधून सुमारे १,६०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होते. २०२१ ते २२ मध्ये दोन्ही रेल्वेचे उत्पन्न ६२० कोटी रुपयांपर्यंतच आहे.

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेमधून करोनाआधी रोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या शंभर टक्के लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानंतरही मध्य रेल्वेवर सध्या दररोज ३५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करीत असून पश्चिम रेल्वेवर रोज साधारण २८ ते ३० लाखांदरम्यान प्रवासी प्रवास करतात. ही संख्या कमीच आहे. प्रवासी कमी असल्याने तिकीट व पासधारकही कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी उत्पन्नातही घट झाली आहे.

पश्चिम उपनगरीय रेल्वेतून २०१९ ते २० मध्ये ७५३ कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. २०२० ते २१ मध्ये करोनामुळे लोकल प्रवासावर निर्बंध आले आणि केवळ १२९ कोटी ३३ लाख रुपयांची भर तिजोरीत पडली. २०२१ ते २२ मध्ये निर्बंध शिथिल झाले असले तरीही प्रवासी संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे २७९ कोटी ९९ लाख रुपये उत्पन्नच मिळाले आहे.

 मध्य रेल्वेलाही वर्ष २०१९ ते २० मध्ये ८७० कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळाले असतानाच २०२० ते २१ मध्ये १६३ कोटी ५२ लाख रुपयांचीच भर पडली. त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत मात्र ३४० कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection central railway suburban railway away from revenue generation akp

ताज्या बातम्या