राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईसह राज्यातील करोना स्थिती शंभर टक्के नियंत्रणात असून ओमायक्रॉनमुळे भविष्यात निर्माण होणारी कोणतीही स्थिती हाताळण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. मुंबईतील करोनास्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून चिंता करू नये, असा दावा मुंबई पालिकेने गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या, वैद्यकीय सुविधांचा तपशील सादर करून केला होता. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील करोनास्थिती स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. 

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी  सुनावणी झाली.  सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया आणि पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली.  मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. परंतु आता रुग्णसंख्येचा आलेख खाली येत असून दररोज दोन हजारांहून कमी नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच रुग्णांलयावर ताण नसून पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचा दावाही पालिकेतर्फे करण्यात आला. तर राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

मुंबईत दिवसभरात १,३१२ रुग्ण

  मुंबई : शहरात करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून शुक्रवारी १,३१२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ४३ हजार ५९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात करोनामुळे १० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६,५९१ झाली आहे.

दरम्यान, ४ हजार ९९० रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९ हजार ३७४ बाधित करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या १४ हजार ३४४ उपचाराधीन रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. याशिवाय शहरातील रुग्ण दुपटीचे प्रमाण २५९ दिवसांवर पोहोचले आहेत.

 तिसऱ्या लाटेत प्रथमच धारावीत शून्य रुग्ण 

डिसेंबरच्या अखेरीस सुरुवात झालेल्या तिसऱ्या लाटेनंतर धारावीतही रुग्णांची वाढ होऊ लागली होती. मात्र मुंबईतील रुग्ण संख्या घटू लागल्यानंतर धारावीतही दैनंदिन रुग्ण संख्या घटू लागली होती. शुक्रवारी दिवसभरात धारावीत एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. दिवसभरात १०२ आरटीपीसीआर चाचण्या तर ५४ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. तिसऱ्या लाटेत एकूण एक हजार ३८१ नवीन रुग्ण आढळले. सर्वात जास्त रुग्ण पहिल्या लाटेत तीन हजार ७८८ रुग्ण आढळले होते. सध्या धारावीत ४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ११ जणांना लक्षणे आहेत व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात २४,९४८ नवे बाधित

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि १०३ जणांचा  मृत्यू झाला. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृतांचा आकडा वाढला आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ४५,६४८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६६,५८६ झाली आहे.

राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ११० रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३०४० झाली आहे. त्यापैकी १६०३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत मुंबई येथे १३१२, ठाणे शहर २८१, कल्याण-डोंबिवली ५१, नवी मुंबई ६१४, पनवेल २२७, रायगड २६६, नाशिक १७२०, नगर ७०३, जळगाव ४४७, पुणे जिल्हा १४५२, पुणे शहर ३३७७, पिंपरी चिंचवड २०९९, औरंगाबाद ३६९, नागपूर २१६१  नवीन रुग्णांची नोंद झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona control m state state government high court ysh
First published on: 29-01-2022 at 02:08 IST