एक टक्क्याहूनही दर कमी; आठ दिवसांत ३३ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील करोना मृत्यूदरात मोठी घट झाली असून डिसेंबरमध्ये तो पाऊण टक्क्यांवर आला आहे. तर नोव्हेंबरमध्ये १.५९ टक्के इतका मृत्यूदर नोंदविला गेला. करोनाचा देशातील सरासरी मृत्यूदर १.३९ टक्के इतका असून राज्याचा सरासरी मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.

डिसेंबरमध्ये ४३९९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३३ मृत्यू झाले. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८५३ इतकी असून त्यापैकी ४०६६ इतके रुग्ण (५९.३ टक्के) रुग्णालयात दाखल आहेत. तर २७६७ रुग्णांना सौम्य किंवा अजिबात लक्षणे नाहीत. मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये ३८४९ रुग्ण आहेत.

राज्यात १२ कोटी तीन लाख १८ हजार इतके लसीकरण झाले असून त्यापैकी सात कोटी ६५ लाख ७१ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.